गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात वसईकरांचे धरणे आंदोलन

ग्रामसेविका, सरपंच आणि गटविकास अधिकारी या तिघींना आपल्या आश्वासनाचा विसर पडला. ग्रामसेविकेने घरपट्टीतील दुरुस्ती तर दुरच चाफेकर यांना त्यांच्या नावात बदल केलेल्या असेसमेंट उताराही दिला नाही.

    वसई : कोणतीही पुर्व सुचना न देता ग्रामस्थांची घरपट्टी विकासकाच्या नावावर करणाऱ्या ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या मुजोर कारभाराविरोधात मी वसईकरांनी बुधवारी पुन्हा एकदा दालनासमोर ठिय्या मांडून धरण धरले.

    तरखड ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि बेशिस्त काराभारा विऱोधात मी वसईकर आणि उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने गेल्या महिन्यात धरणे आंदोलन केले होते. ग्रामपंचायत अधिनियम आणि कायदा मोडून तरखड ग्रामपंचायतीचा कारभार सुरु आहे, सुनावणीची प्रक्रिया न करता स्थानिक भुमिपुत्रांच्या राहत्या घराच्या घरपट्टीच्या बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या नावावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्या जात आहेत. घरपट्टीच्या वाढीव आकारणीबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि वाढीव घरपट्टीचा बोझा सहन करणे हे अनेक स्थानिक भुमिपुत्रांना शक्य नाही. जबरदस्तीने ग्रामस्थांवर नव्याने घरपट्टीची आकारणी करुन वाढीव घरपट्टीचा बोझा सामान्य ग्रामस्थांवर टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसेच ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयात मिळणारी वागणुक ही सौजन्यशील नसल्याचे अनेक अनुभव ग्रामस्थांना येत आहेत. विकासाच्या नावाखाली कोणतीही पायाभुत सुविधा गावात नसताना बिल्डरांना टॉवर उभारण्याकरीता नाहरकत दाखला देऊन गावाचे गावपण नष्ट केले जात आहे. ग्रामस्थांच्या पत्रांना उत्तर न देणे, दफ्तरीतील माहिती देण्याचे नाकारणे असे प्रकार केले जात आहे. या मुद्द्यांवर २६ ऑक्टोबरला हे आंदोलन करण्यात आले होते.

    या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी संगीता भांगरे, उपसरपंच सुनीता लेमोस आणि ग्रामसेविका जागृती वडे यांनी मंडपात आंदोलकांची भेट घेतली. ब्रिटिशांच्या कालावधीपासून आक्टन गावात वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या चाफेकर कुटुंबीयांचे नावे असलेली घरपट्टी त्यांना कोणतीही सुनावणीची संधी न देता दुसऱ्याच्या नावे करण्यात आली. ही बाब मी वसईर अभियानाचे अध्यक्ष मिलींद खानोलकर यांनी त्यांच्यापुढे मांडली होती. त्यावेळी आंदोलनाची वाढती तिव्रता लक्षात घेऊन चाफेकर कुटुंबावरील अन्याय दूर केला जाईल असे आश्वासन यावेळी भांगरे यांनी यावेळी दिले होते, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

    मात्र, ग्रामसेविका, सरपंच आणि गटविकास अधिकारी या तिघींना आपल्या आश्वासनाचा विसर पडला. ग्रामसेविकेने घरपट्टीतील दुरुस्ती तर दुरच चाफेकर यांना त्यांच्या नावात बदल केलेल्या असेसमेंट उताराही दिला नाही. गटविकास अधिकारींनाही त्यांनी त्यासाठी त्यांच्या कार्यालयात ५ वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नाही. सहाय्यक गट विकास अधिकारी यांची दोन वेळा भेट घेतली, कार्यालय सहायक यांचीही दोनदा भेट झाली पण चाफेकर बंधूंना कोणीच समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांच्या पात्रालाही उत्तर दिले नाही. परिणामी चाफेकर कुटंब आणि मिलींद खानोलकर यांनी बुधवारी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालना बाहेर धरणे धरले. मात्र, दुपारी एक वाजले तरी गटविकास अधिकारी मॅडम न आल्यामुळे त्यांची वाट पाहत असंवेदनशील प्रशासनाचा धिक्कार मिलिंद खानोलकर यांनी केला.

    दरम्यान, हे आंदोलन बुधवारी रात्री पावणे एक पर्यंत सुरू होते. त्यावेळी वसईचे पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सकाळी १० वाजता कार्यालयात या मी तुम्हाला असेसमेंट उतारे देते असा गट विकास अधिकाऱ्यांच्या निरोप दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी साडेदहा वाजूनही मॅडम न आल्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू झाले.