Dhirendra Shastri's big revelation

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा सत्संग पुण्यात भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अनिंसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच, त्यांच्या चमत्कारवरदेखील आक्षेप घेतले होते. आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मोठे स्पष्टीकरण दिले आहे.

  पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्याला आव्हानही दिले आहे. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्रींनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले आहे. यावेळी पत्रकारांनी धीरेंद्र शास्त्रींना संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या चुकीची जाणीव झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
  धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो. त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होते तेवढे वाचले आहे. मी असे कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेले नाही.
  माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर…
  “तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. कुणी साखर म्हणते, तर कुणी शुगर म्हणते. त्यामुळे मी निश्चितपणे स्वीकारले की, माझ्या बोलण्यामुळे वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या. माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली,” असं मत धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केलं.
  मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे
  “मी आचार्य परंपरेचा साधक आहे. असा व्यक्ती कोणत्याही संताचा विरोध करेल असं होणार नाही. तसेच असा विरोध करणारा संतांचा अनुयायी होऊच शकत नाही. मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे. त्यामुळे मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील. म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर खेद व्यक्त केला होता,” असंही धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केलं.
  तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत तरंगले
  धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “मी संत तुकाराम महाराजांच्या शीलेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपले अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले होते. मात्र, संत तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत बुडाले नाहीत. त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नाही आणि ते पाण्यावर तरंगले. ही संतांची परंपरा आहे.”
  “भारत हिंदूराष्ट्र होईल”
  संतांचा आशीर्वाद कायम राहिला तर…
  भारत अद्भूत देश आहे. या संतांचा आशीर्वाद कायम राहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न संपूर्ण भारतात यशस्वी होईल. तसेच भारत हिंदूराष्ट्र होईल, अशीच प्रार्थना मी केली आहे,” असंही धीरेंद्र शास्त्रींनी नमूद केले आहे.