वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने त-हाडी परिसरातील शेतकरी त्रस्त, आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

आज संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त केला.

    धुळे : शिरपूर तालुक्यातील त-हाडी सह परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून कृषी तसेच गावठाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्यामुळे पिके करपू लागली आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त केला. विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

    त-हाडी सह परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी. वरुळ येथे ३३ के.व्ही. क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रावरून परिसरातील त-हाडीसह वरुळ भटाणे जवखेडा त-हाड कसबे भामपुर, टेकवाडे नवे-जुने अंतुली नवे-जुने लोढरे अभानपुर जळोद, ममाणे आदि गावांच्या गावठाण व कृषी क्षेत्राकरिता विद्युत पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विद्युत पुरवठ्यात सातत्याने बिघाड होत आहे. परिणामी दिवसा तसेच रात्रीतून होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरगुती तसेच कृषी क्षेत्रातील ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत.

    विशेष म्हणजे विजेचा लपंडावाचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. वास्तविक कृषी क्षेत्राच्या शेड्युलनुसार दररोज किमान आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. असे असताना झिरो लोड सेटिंगच्या नावाने दिवस-रात्र पाळीतून केवळ तीन ते चार तास विद्युत पुरवठा होत आहे. त्यातही वेळोवेळी व्यत्यय येत असल्याने पिकांना पाणी देतांना शेतकरी हतबल झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिके करपू लागली असताना त्यात अपुऱ्या विजेच्या पुरवठ्याने भरचं घातली आहे. त्यामुळे पिकांना कसे वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.