पाटील कुटुंबाला काढले फायनान्स कंपनीने घराबाहेर, नियमित हफ्ता भरूनही घरावर कब्जा

घर बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन घराला सील ठोकले असा आरोप करत न्यायासाठी एका कुटूंबाने उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.

    धुळे : नियमित हप्ते भरुन देखील फायनान्स कंपनीच्या गुंडांनी आणि एजन्टनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची धमकी देत कुटूंबाला बेघर केले. एवढेच नव्हे तर ते घर बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन घराला सील ठोकले असा आरोप करत न्यायासाठी एका कुटूंबाने उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे. सिसोदीया नगर, प्लॉट नं. ५० शिरपूर येथील निता दिपक पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे.

    इंडिया शेल्टर होम लोन्स या फायनान्स कंपनीकडून १३ डिसेंबर २०१९ रोजी १३ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते नियमित भरलेले असतानाही फायनान्स कंपनीचा शाखाधिकारी आणि वसुली अधिकारी हे वेळोवेळी गुंडांना आणि खाजगी एजन्टला घेऊन माझ्या घरात विनापरवानगी घुसतात, हुज्जत घालतात मला अश्लील भाषेत शिवीगाळ करत आणि थकित असलेल्या हप्त्यांची मागणी करीत असतात.

    २४ ऑगस्ट रोजी कोणती पुर्व सुचना न देता, नोटीस न देता, घरातुन लवकर बाहेर निघ, नाहीतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बाहेर काढावे लागेल असा दम देत शिवीगाळ करुन आमच्या कुटूंबाला बाहेर काढले घरातील संपूर्ण सामान, मुलांची शालेय पुस्तके, वह्या, दागदागिने घरातच राहू दिले. मुलाची परिक्षा असताना आम्ही बेघर झालो आहे. शाखाधिकाऱ्यांसह इतरांनी शिवीगाळ करुन आम्हाला धक्काबुक्की केली. थकित रक्कमेपैकी १ लाख रुपये भरण्यास तयार आहे असे सांगितल्यानंतरही १ लाख रुपये तुझ्याजवळच ठेव, आम्हाला पुर्ण पैसे दे नाहीतर तुझ्या परिवाराला मारहाण करुन बाहेर काढू अशी धमकी देत मला मारहाण केली.

    इंडिया शेल्टर फायनान्स कंपनीने आम्हाला घराबाहेर काढत घराच्या दरवाजाला कुलुप लावून बेकायदेशीर जप्ती करुन घेतली आहे. त्यामुळे फायनान्स कंपनीचा शाखाधिकारी, वसुली अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या इसमांविरुध्द कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हाला आमच्या घराचा ताबा मिळावा अशी मागणी निता पाटील, दीपक शिवलाल पाटील, जीवीका दीपक पाटील, दिव्येश पाटील यांनी केली आहे.