नकाणे उपनगरात परंपरेनुसार फोडण्यात आला बैल पोळा, परंपरा कायम ठेवत साजरा केला बैलपोळा

पोळा फोडण्याच्या शर्यतीत प्रथम व द्वितीय आलेल्या बैलाच्या मालकांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले.

    धुळे : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये काल बैलपोळा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षाची परंपरा अखंडित ठेवत धुळे शहरालगत असलेल्या नकाणे उपनगरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची आकर्षक सजावट करून गावातील मंदिरांना प्रदक्षिणा घालत शेतकऱ्यांकडून बैल पोळा साजरा करण्यात आला. यावेळी पोळा फोडण्याच्या शर्यतीत प्रथम व द्वितीय आलेल्या बैलाच्या मालकांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले.

    विदर्भ आणि मराठवाड्यात श्रावणातील अमावस्येला बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. धुळे शहरालगत असलेल्या नकाने उपनगरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत गावकऱ्यांकडून बैलपोळा फोडण्यात आला. यावेळी शेतकरी आपल्या बैलांची स्वच्छ अंघोळ घालून आकर्षक सजावट करतात. त्यानंतर बैल हे गावातील ग्रामदैवतांच्या मंदिरांना प्रदक्षिणा घालून गावाबाहेर असलेल्या वेशीवर एकत्र आणले जातात.

    त्या ठिकाणी आल्यावर बैलपोळा फोडला जातो यावेळी सर्व बैल वेशिपासून गावाच्या प्रवेशद्वारा कडे धाव घेतात. यात जो बैल गावाच्या प्रवेश द्वारात प्रथम प्रवेश करेल त्या बैल मालकाला आकर्षक बक्षीस दिले जाते व तो पूर्ण वर्षाभराचा गावातील मानाचा बैल मानला जातो अशी परंपरा कायम ठेवत बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.