
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठी स्पर्धा पाहयला मिळणार आहे. त्यापूर्वी २६ फेब्रुवारीला कसबा आणि पिंपरी-चिंचवडच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकाही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानण्यात येतायेत. या सगळ्याचं नियोजन करण्यासाठीच ही बैठक बोलावली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबई– गुवाहाटीत झालल्या ऐतिहासिक बंडानंतर आणि राज्यात सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५० आमदारांची (MLA) एकत्र बैठक (Meeting) आज बोलावलेली आहे. आज सकाळच्या वेळी ही बैठक होणार आहे. तर याचबरोबर भाजपानंही आज त्यांच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे. ही बैक संध्याकाळी सात वाजता होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन, महापालिका निवडणुका, शिवसेना पक्षचिन्हाचा वाद, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी या सगळ्या पार्श्वभूमीर या दोन्ही बैठका महत्त्वाच्या मानण्यात येतायेत.
काय शिजतंय राजकारणात?
राज्यातील राजकारणात आगामी काळात नवं काही घडणार का, याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत येत्या आठवड्याभरात चित्र स्पष्ट होण्याची स्पष्टता आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात आठवडाभरात सुनावणी झाल्यास आणि मान्यता दिल्यास लवकरच महापालिका निवडणुकांची मिनी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात होऊ घातली आहे. त्यातही मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठी स्पर्धा पाहयला मिळणार आहे. त्यापूर्वी २६ फेब्रुवारीला कसबा आणि पिंपरी-चिंचवडच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकाही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानण्यात येतायेत. या सगळ्याचं नियोजन करण्यासाठीच ही बैठक बोलावली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
पक्षचिन्ह आणि सत्तासंघर्ष सुनावणी
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यातच हाही निर्णय लवकर लागण्याची शक्य़ता आहे. तर १४ फेब्रुवारीला व्हँलेंटाईनच्या दिवशी सत्तासंघर्षाची सुनावणीही सुप्रीम कोर्टात होईल. या दोन्ही निर्णयाकडं राज्याचं लक्ष असेल. कोणताही निर्णय झाला, तरी पुढच्या उपाययोजनांची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विस्तारापूर्वी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
येत्या काळी काळात पुढच्या १०-१५ दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल, असे संकेत देण्यात येतायेत. यात दोन्ही बाजूंनी अनेकजण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. आजच्या बैठकीत सगळ्याच नेत्यांशी याबाबत चर्चा करुन, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्राथमिक प्रयत्न करण्यात येईल, असंही सांगण्यात येतंय. आगामी काळात राज्यात राजकीय घडामोडी वेगवान घडणार आहेत, त्यासाठी सगळ्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तयार राहण्याचं आवाहनही या बैठकीत करण्यात येण्याची शक्यता आहे.