dilip dhodi

राज्य निवडणूक आयोगाने मताधिक्याच्या आधारे दिलीप धोडी (Dilip Dhodi) यांना बोईसर ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच (Sarpanch Of Baisar Grampanchayat) म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे.

    बोईसर : अखेर बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Boisar Grampanchayat Election) निकालाची प्रतीक्षा संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मताधिक्याच्या आधारे दिलीप धोडी (Dilip Dhodi) यांना बोईसर ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच (Sarpanch Of Baisar Grampanchayat) म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याविषयी निर्णय घेतला आहे.

    बोईसर ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी पाच मते तांत्रिकदृष्ट्या मोजली जात नसल्यामुळे हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे मतमोजणी निकाल जाहीर करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले. मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यासाठी परवानगी दिल्याने दिलीप धोडी यांच्या अधिकृतरित्या सरपंच पदाच्या घोषणेचा मार्ग मोकळा झाला आहे.

    बोईसर येथील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील कंट्रोल युनिट पाचमध्ये नोंद झाल्यानंतर बिघाड झाला. त्यानंतर हे यंत्र बदलण्यात आले व निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतमोजणी करताना बिघडलेल्या यंत्रामधील निकाल समोर आला नसल्यामुळे यावर सरपंच पदाचे दावेदार अनिल रावते यांनी आक्षेप नोंदवला. त्यानुसार हे प्रकरण स्थानिक स्तरावर सुटत नसल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले. अखेर राज्य निवडणूक आयोगाने या सर्व बाबींचा विचार करून १२९ मतांचे मताधिक्य असलेल्या दिलीप धोडी यांना सरपंच जाहीर करण्यासाठी परवानगी दिली असून तो घोषित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यामुळे दिलीप धोडी यांच्या सरपंच पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    दिलीप धोडी यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत ५८४८ मते मिळाली असून अनिल रावते यांना ५७१९ मते मिळालेली आहेत. दोघांमध्ये १२९ मतांचा फरक असल्यामुळे सर्वाधिक मताधिक्य असलेल्या धोडी यांचा विजय मान्य करून त्यांना बोईसर ग्रामपंचायत सरपंच घोषित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत पत्र जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी पाठवले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून दिलीप धोडी यांना अधिकृतरित्या सरपंच म्हणून जाहीर केले जाणार आहे. या सरपंच पदाचा निकाल व घोषणा जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची प्रतीक्षा न करता दिलीप धोडी यांनी निकाला आधीच बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा ताबा घेतला असल्याचे समजते.