दिव्यांग निधी खर्चावरून गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात अपंगाचा ठिय्या

ग्रामपंचायतकडील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील दिव्यांगासाठीचा निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना देऊन देखील हा निधी संबंधित ग्रामपंचायतींनी खर्च न केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

    मंगळवेढा : ग्रामपंचायतकडील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील दिव्यांगासाठीचा निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना देऊन देखील हा निधी संबंधित ग्रामपंचायतींनी खर्च न केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनानंतर जागे झालेल्या गटविकास अधिकारी यांनी ४९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

    गेल्या दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचयातीकडे असणारा 5 टक्के निधी 31 मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा गटविकास अधिकारी यांना घेराव घालून खुर्ची कार्यालयाबाहेर काढण्याचा इशारा अपंग प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला. परंतु, पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे 9 मे रोजी अपंगाच्या रोषाला सामोरे जावे लागले. दिव्यांगासाठी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीने दरवर्षी येणाऱ्या निधीतून निधी खर्च करणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप जवळपास 49 ग्रामपंचायतीने निधी खर्च केला नाही.

    निधी खर्चावरून संबंधित ग्रामपंचायतीवर कोणती कारवाई केली असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर गटविकास अधिकारी यांना बोलता येईना, याबाबतची माहिती संबंधित ग्रामसेवकांना विचारून घ्या, असे सांगितल्यानंतर अपंगाच्या भावना आणखीन तीव्र झाल्या. त्यांनी याबाबत कारवाईची भूमिका घेतल्याशिवाय कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतली.