बदल्यांवरुन संचालकांत मतभेद ; जिल्हा बँकेचे कामकाज विस्कळित होण्याची भीती

जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बँकेच्या, ग्राहकांच्या हितापेक्षा राजकारणासाठी बदल्यांचा हत्यारासारखा वापर केला जात आहे.

  सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बँकेच्या, ग्राहकांच्या हितापेक्षा राजकारणासाठी बदल्यांचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. यामुळे बँकेचे जिल्हाभरातील कामकाज विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
  जिल्हा बँकेतील संचालकांनी त्यांना हव्या असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावाच्या ठिकाणी नियुक्त्या मिळवून दिल्या आहेत, मात्र यामध्येही ग्राहकांशी चांगला संवाद साधणाऱ्या व कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. तरीही मागील काही महिन्यात या बदल्यांवरुन एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण वाढले आहे. एकाच गावातील दोन नेते दोन वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी भांडताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांचा हा धडाका प्रथमच अनुभवास आला आहे.
  जिल्हा बँकेत कर्जासाठी जसा वशिला लागतो तसा वशिला कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीही लागतो. संचालकांची मर्जी सांभाळताना अनेक अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या हिताचे निर्णयही घेत असतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना अधिक मागणी असते, मात्र हा नियम आता बदलला आहे.

  कार्यक्षमता कमी होण्याची चिन्हे
  एखाद्या कर्मचाऱ्याने ऐकले नाही तर त्याला जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला टाकले जाते. अशा प्रकरणांमुळे कर्मचाऱ्यांकडून कामांची औपचारिकता पार पाडली जाते. प्रति कर्मचारी कार्यक्षमता कमी होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होऊ शकतो.

  वशिलेबाजी व खाबुगिरीला ऊत
  जिल्हा बँकेत वशिलेबाजी व खाबुगिरीला ऊत आला आहे. वशिलेबाजी करुन हव्या त्या जागी बदली करुन घ्यायची किंवा त्यासाठी खिसे गरम करायचे, असा चुकीचा पायंडाही पडला आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत.