विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद; काँग्रेस नाराज

    शिवसेनेत (Shivsena) राजकीय भूकंप (Political Earthquake) होण्याचे चिन्ह असताना काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवाने नाराजी वाढली आहे. यापुढे महाविकास आघाडीत (MahaVikas Aghadi) राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे वक्तव्य काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी केले आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.

    काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळाले, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे नसीम खान म्हणाले. पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते आता दिल्लीत धाव घेण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींना भेटून पक्षातील या घडामोडी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले. तर, काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मते फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ ४१ मते मिळाली आहे.