
खरीपाचे पीक हातचे गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतील अग्रीम राशीचे वितरण सुरू झाले आहे. धनोत्रयोदशीच्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम रक्कम जमा होते आहे.
नागपूर : खरीपाचे पीक हातचे गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम राशीचे वितरण सुरू झाले आहे. धनोत्रयोदशीच्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम रक्कम जमा होते आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. जिल्ह्यातील 63,827 शेतकऱ्यांना 52.49 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना 1 रुपयात पंधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला. या योजनेत राज्यातील 1.71 कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. संबंधित विमा 2 कंपन्यांनी एकूण 1700 कोटींची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. दिवाळीपूर्वी किमान 25 टक्के अग्रीम राशी शेतकऱ्यांच्या खात्यात यावी, यासाठी शासन आग्रही होते.
शेतकऱ्यांच्या नजरा देखील त्याकडे लागल्या होत्या. दिवाळी तोंडावर येऊनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रीम राशी जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.
अग्रीम राशी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण, लवकरच शेतीचा खर्च भागविण्यासाठी पैशांची गरज भासणार असल्याने शासनाने तत्परतेने प्रयत्न करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम मिळवून देण्याची. मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.