त्यांचा ‘माफीनामा’ यांचा ‘राजीनामा’, नगर जिल्ह्यात दोन ‘नामां’ची चर्चा

डॉ. सुजय विखे यांचा आलेला माफीनामा आणि नीलेश लंके यांचा आलेला राजीनामा हे दोन्ही अनिच्छेने आलेले आहेत. पाच वर्षांत ज्याची फिकीर बाळगली नाही, पण निवडणुकीसाठी दुसरा पर्याय नाही, म्हणून विखे यांनी भर सभेत माफी मागितली. तर आमदारकी शाबूत ठेवून लोकसभेच्या रिंगणात पत्नीला उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही ते साध्य न झाल्यामुळे लंके यांचा राजीनामा आला आहे.

    अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली असून, अहमदनगर मतदारसंघात यावेळी दोन ‘नामा’ चांगलेच चर्चेत आले आहेत. एक ‘नामा’ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आला होता, तर दुसरा ‘नामा’ जाहीर होताच उमेदवारी आली आहे. यातील एक ‘माफीनामा’ होता, तर दुसरा ‘राजीनामा’ होता. मात्र हे दोन्ही सादर करताना मनातून किती आणि वरवर किती याबाबत संबंधित नेत्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही संभ्रम आहे.
    लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार, असे प्रश्न उपस्थित होत होते. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्यात खा. डॉ. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र तो पर्यंत विखे यांना उमेदवारी मिळणार नाही, असे पक्षतील काही स्थानिक नेते, पदाधिकारी खात्रीने सांगत होते. वास्तविक विखे यांना नाहीतर मग कोणाला उमेदवारी मिळणार, याचे उत्तर त्यांच्याकडेही नव्हते. मात्र ‘यावेळी उमेदवार बदलणार’ अशी चर्चा भाजपमध्ये जोरदार होती. त्याला कारण म्हणजे विखे यांची वागणूक. कार्यकर्ते, स्थानिक काही नेते, नागरिक यांचे फोन न घेणे, खासदारांना भेटायचे असेल तर चार-पाच स्वीय सहायकांचा आधार घ्यावा लागणे असे बरेच मुद्दे नाराजीचे होते. डॉ. सुजय विखे यांचे वडील राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट सहज मिळत असताना खासदारांना आमचे वावडे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

    आपल्याबाबत पक्षातील काही पदाधिकारी, नेत्यांत वाढत चाललेल्या नाराजीची कल्पना डॉ. विखे यांना नव्हती, अशातला प्रकार नाही. मात्र त्यावर त्यांनी वेळीच उपाययोजना केली नाही, ही वस्तुस्थिती. मात्र भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या नाराजीचा फटका बसू शकतो, याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात मागील पाच वर्षांत झालेल्या चुकांबाबत चक्क ‘माफीनामा’ सादर करण्यात आला. त्यांचा हा ‘माफीनामा’ बराच गाजला. सोशल मीडियातून त्यावर चर्चाही झाली.

    डॉ. विखे यांचा ‘माफीनामा’ आल्यानंतर काही दिवसांनी अचानक विखे यांचे प्रतिस्पर्धी पारनेरचे आ. नीलेश लंके यांचा ‘राजीनामा’ आला. विखे यांच्या माफीनाम्याप्रमाणेच लंके यांचा राजीनामाही आता चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात लंके नेमके कोणत्या पक्षाचे, ते कोणाला नेता मानतात, याबाबतच संभ्रम कायम असायचा. शिवसेनेत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांचे नेते होते. शिवसेना सोडून विधानसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली त्यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे त्यांचे नेते होते. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतर या तिघांबरोबरच पुन्हा उद्धव ठाकरे त्यांचे नेते झाले. ठाकरे यांनीही मुख्यमंत्री होण्यापूर्वी ज्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते, तेथे जाऊन लंके यांचे तोंडभरून कौतूक केले होते.

    त्यावेळी याच लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून आपण हाकलले होते याचा विसर त्यांना पडला. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले विजय औटी यांचा पराभव लंके यांनी केलेला असतानाही ठाकरे यांनी त्यांना त्यावेळी मांडीवर घेतले. लोकसभा निवडणूक लढवायची, ही खुणगाठ लंके यांनी बांधली होती. मात्र रिंगणात स्वतः ऐवजी पत्नीला उतरवायचे, हे मनाशी पक्के ठरवले होते. त्यामुळेच ते अजित पवार गटातून शरद पवार गटात दाखल झाले. मात्र शरद पवार यांनी लंके यांना स्वतः उमेदवारी करावी लागेल, असे स्पष्ट सांगितल्याने पत्नीला रिंगणात उतरविण्याचे मनसुबे उधळले गेले. ही नाराजी असली तरी आता पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले. शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी येण्याच्या अगोदर एक दिवस त्यांचा ‘राजीनामा’ आला. राजीनामा येताच लगेच उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव आले.