वीज मीटर रीडिंग घेणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ

हेतुपुरस्सर चुका आणि अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना (Reading Agency) बडतर्फ (Dismiss) करण्यात आले आहे.

    लघुदाब वर्गवारीतील (Low Pressure Classification) सुमारे दोन कोटी १५ लाख ग्राहकांना वीज वापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे (Meter Reading) बिल (Bill) देण्यासाठी महावितरणने (MSEDCL) गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका आणि अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना (Reading Agency) बडतर्फ (Dismiss) करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

    मराठवाड्यातील १६ एजन्सीजचा समावेश आहे. या कारवाईने गत महिन्यात तक्रारींमध्ये घट आणि वीज विक्रीत १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महसुलात वाढ झाल्याची नोंद महावितरणने घेतली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी एजन्सी संचालक, लेखा अधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे आढवा बैठक घेऊन एजन्सींबाबत निर्णय घेतला. नांदेड परिमंडळातील १०, जळगाव ८, अकोला ७, लातूर ४, कल्याण ४, बारामती ४, नाशिक ४, औरंगाबाद २, पुणे १, चंद्रपूर १, कोकण १, अमरावती १ येथील एकूण ४७ एजन्सीजचा समावेश करण्यात आला आहे.

    फेब्रुवारी २०२१पासून याची अंमलबजावणी सुरू झाली होती. २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. या एजन्सीजनी काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो आणि प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, आदी प्रकार आढळून आले.