ahmednagar crime

जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते. संगमनेरमधील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते. जोर्वे नाका परिसरात हे तरुण आले असता या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली होती. युवकांनी आपल्या मोटरसायकलचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांना हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने त्यांनी या दोन युवकांना मारहाण केली.

    अहमदनगर: किरकोळ कारणावरून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner Crime News) शहरातील जोर्वे नाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तात जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून 150 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे (Crime News) दाखल करण्यात आले आहे. (Ahmednagar News)

    हॉर्न वाजवल्याच्या रागात भांडण
    जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते. संगमनेरमधील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते. जोर्वे नाका परिसरात हे तरुण आले असता या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली होती. युवकांनी आपल्या मोटरसायकलचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांना हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने त्यांनी या दोन युवकांना मारहाण केली. यावेळी जोरदार बाचाबाची झाली. यानंतर हे युवक जोर्वे येथे निघून गेले. त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर जोर्वे येथील ग्रामस्थ पोलीस ठाण्यात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. या ठिकाणी शिवीगाळ आणि हाणामारी झाली.

    राज्य राखीव पोलीस दल घटनास्थळी रवाना
    एका समाजाच्या काही युवकांनी यावेळी धारदार शास्त्रांचा वापर केला. या हाणामारीत जोर्वे येथील 6 जण जखमी झाले. जखमींमध्ये जितेंद्र दिघे, अजित थोरात, सुमित थोरात, तन्मय दिघे, विजय थोरात, कुंडलिक दिघे यांचा समावेश आहे. धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेर शहरात त्वरित राज्य राखीव पोलीस दल रवाना केलं. याप्रकरणी रवींद्र गाडेकर (राहणार जोर्वे) यांच्या फिर्यादीवरून 15 आरोपींसह अज्ञात शंभर ते 150 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया
    दरम्यान अशा वेळी जातीय सलोखा राहिला पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्याची प्रशासन आणि आम्ही काळजी करु. पुन्हा अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.