कोल्हापूर हद्दवाढप्रश्नी हसन मुश्रीफांविरोधात असंतोष; जिल्हाधिऱ्यांना निवेदन

कोल्हापूर महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

    कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

    कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या 50 वर्षांत अजिबात हद्द वाढ झाली नाही. याबाबत अनेक प्रस्ताव सादर होऊनही पुढे काहीच घडले नाही. आता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ झाले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक घेतली. तेव्हा माझ्या पद्धतीने हद्दवाढ करणार आहे, असे विधान केले होते.

    मुश्रीफ यांच्या या विधानाविरोधात ग्रामीण भागातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध करीत आज १८ गावांमध्ये बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच ग्रामीण भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अनेक गावांमध्ये सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली.

    उचगाव येथे सरपंच मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन हद्दवाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुडशिंगे येथे तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाडीविरोधात आंदोलन करण्यात आले.

    दरम्यान, हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हद्दवाढ विरोधात लक्षवेधी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती उजळाईवाडीचे राजू माने यांनी दिली.