आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी उतरले थेट गोदावरी नदी पात्रात; आठ तासांनंतर आंदोलन मागे

वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपूर्वीच उपोषण करण्यात आले, मात्र उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने पुन्हा ग्रामस्थाने जल आंदोलन केलं होतं

    बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी इथल्या गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला वाळू उपसा बंद करण्यात यावा. या मागणीकरिता ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात तब्बल आठ तास आंदोलन केलं. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

    स्वतः जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याकरिता गोदावरी नदी पात्रात उतरले होते. सोमवार पर्यंत बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ असा शब्द दिला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील ग्रामस्थांसह आठ तास पाण्यात उभा राहून या आंदोलनात सहभाग घेतला होता. या ठिकाणचा वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपूर्वीच उपोषण करण्यात आले, मात्र उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने पुन्हा ग्रामस्थाने जल आंदोलन केलं होतं. दिवसभर या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा होती.