‘हर घर तिरंगा’! दक्षिण तहसील कार्यालयात झेंडा विक्रीचा शुभारंभ ; घरोघरी तिरंगा लावण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या राष्ट्रीय ध्वज विक्री व वितरणाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.

    सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या राष्ट्रीय ध्वज विक्री व वितरणाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. प्रत्येक नागरिकांनी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन शंभरकर यांनी केले.

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, हर घर तिरंगा उपक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, प्रांताधिकारी सुजित शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, नायब तहसीलदार शुभांगी जाधव, नायब तहसीलदार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले.

    तहसील कार्यालयाच्या बाहेर बसवण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटमध्ये स्वतः जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन फोटो काढत नागरिकांचा उत्साह वाढवला.