शेतकरी संघाच्या इमारतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ताबा ; भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी निर्णय

शेतकरी संघाच्या इमारतीत अंबाबाईची दर्शन रांग

    कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सव आणि सुट्टीच्या काळातील गर्दी कमी करण्यासाठी आणि भाविकांच्या सुविधासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कारण पुढे काढून शेतकरी संघाच्या भवानी मंडपातील इमारत ताब्यात घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला आहे. त्यानुसार आज या इमारतीचा ताबा प्रशासनाने घेतला.

    नवरात्र उत्सव सोहळा अवघ्या काही दिवसावर आला असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्यासाठी दर्शनी रांग उभी करता यावी मी हेतूने मंदिराच्या जवळ शेतकरी संघाची इमारत घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संघ व्यवस्थापनास मागील चार दिवसात नोटीस बजावली होती. त्यानंतर आज आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नवरात्रोत्सवासाठी या इमारतीचा ताबा घेण्यात आला.  मात्र नवरात्रोत्सवासाठी शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयाची इमारत हडप करण्याचा डाव राज्यकर्त्यांकडून आखला जात असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

    -पार्किंग नसल्याने शेतकरी बाजार बंद
    अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या मोठी असली तरी काळाचा विचार करता दिडशे वर्षापूर्वी मंदिराच्या आवारात अनेक इमारती आहेत. त्याचे जतन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. १९६० च्या दशकात अशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या शेतकरी संघास छत्रपती शहाजी महाराजांनी जागा खरेदी दिली. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात शिक्षण, क्रीडा आणि सहकाराचा सुरेख मिलाफ झाला. शेतकरी संघाचे कापड दुकान, शेतकरी बाजार, मॅग्नेट बाजार या इमारतीत सुरू होता. पण अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने भवानी मंडप केएमटी बस आणि अन्य वाहनांसाठी बंद केल्याने पार्किंग नसल्याने शेतकरी बाजार बंद पडला.

    दरम्यान अंबाबाई मंदिरातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी दर्शन मंडप उभारण्यासाठी विद्यापीठ हायस्कूल, शेतकरी संघाच्या इमारतीचा विचार गेले दहा वर्षे सुरू आहे. अंबाबाई मंदिरात तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी दर्शन मंडप उभारण्यासाठी विविध पर्याय आणि जागा पाहण्यात आल्या. पण मंदिराचे सौदर्य झाकले जाऊ नये यासाठी पर्याय शोधण्यात येऊ लागले. शेतकरी संघ आणि मॅग्नेट कंपनीतील आर्थिक वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लवादही नेमला आहे.

    मॅग्नेट कंपनीला लवादाच्या आदेशानुसार कोट्यवधीची रक्कम देऊन जागा परत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शेतकरी संघाची जागा पश्चिम देवस्थान व्यवस्थापनाने ताब्यात घ्यावी यासाठी गेले पाच वर्षे प्रयत्न सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापना झाल्यावर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी रेटा वाढला आहे. मेन राजाराम हायस्कूल दुसरीकडे हलवून ही इमारत ताब्यात घेण्याचे राज्यकर्त्यांचे प्रयत्नही झाले. आता शेतकरी संघाची इमारत हडप करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

    – मालाची विक्री करण्यासाठी मॉल उभारण्याची गरज
    शेतकरी संघ आणि मॅग्नेटमधील वाद मिटवा यासाठी कोणत्याच राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाहीत. मॅग्नेटकडून जागा ताब्यात घेऊन शेतकरी बझार पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न्ा झाले पाहिजेत. शेतकरी बाजारात जिल्ह्यातील नामवंत सहकारी संस्थांची उत्पादने एका छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शेतकरी संघ, गोकुळ, वारणा, शाहू या नामवंत संस्थाबरोबर साखर कारखाने, सहकारी संस्थांकडून तयार झालेल्या मालाची विक्री करण्यासाठी मॉल उभारण्याची गरज आहे. हजारो भाविक व पर्यटक या मॉलला भेट दिली तर कोल्हापूरच्या दूध, दुग्दजन्य पदार्थ, गूळ, गुळाचे पदार्थ, कोल्हापूरी चटणी, मसाले, आजरा घनसाळ, कोल्हपूरी चप्पल, कोल्हापूरी साज आणि दागिने यांची जगाला ओळख होऊ शकते. त्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासनाने
    एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

    आर्थिक उलाढाल वाढू शकणार
    शेतकरी संघाच्या इमारतीचा वापर जिल्ह्यातील ब्रॅंडेड सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शेतकरी मॉल उभारण्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादीत वस्तूंचे ब्रॅडिंग आणि आर्थिक उलाढाला वाढू शकणार आहे. त्यांच्या आदेशामुळे सहकार क्षेत्रात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.