District Congress letter bomb against Sanjay Raut; Congress Workers Advice to Sanjay Raut that give honor to Sangli Congress leaders

  सांगली : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी डॉ. विश्वजीत कदम यांचे विमान गुजरातला भरकटू शकते, असे विधान केले होते.त्यावर आता जिल्हा काँग्रेस आक्रमक झाले असून याविरोधात थेट जाहीर पत्राद्वारे काँग्रेस नेत्यांचा उल्लेख सन्मानाने करण्याचा सल्ला दिला आहे.

  या मान्यवरांच्या पत्रात सह्या

  या पत्रावर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, सिकंदर जमादार, मनोज सरगर, सुशील गोतपागर आदींच्या सह्या आहेत.

  पत्रातील मजकूर

  शिवसेना नेते खा. संजय राऊतजी सांगली जिल्हयाच्या दौ-यावर असताना आमचे नेते, माजी मंत्री, विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब व विशाल पाटील यांच्यावर टिपणी केली आहे. विशाल पाटील यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या भाषणातील वाक्याचा संदर्भ घेऊन जे वक्तव्य संजय राऊतजी यांनी केले आहे याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो.

  आमदार विश्वजित कदमांवर सांगलीकरांचे प्रेम

  आ. विश्वजीत कदम हे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते कार्याध्यक्ष राहिले आहेत. सलग दोनवेळा विधानसभेचे आमदार म्हणून काम करीत आहेत, महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनसुद्धा काम केले आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळाच्या व महापुराच्या वेळी आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रचंड काम केलेले समस्त सांगलीकरांनी पाहिलेले आहे.

  त्याचबरोबर विशाल पाटीलसुध्दा स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांचे नातू आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. असे असताना सुध्दा संजय राऊतजी यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केले आहे ते जिल्हयातील काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. सांगलीत येऊनच येथील लोकप्रिय नेत्याबद्दल असे उद्‌गार येथील स्वाभिमानी जनेतेला मान्य नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता, इथून पुढे सांगली जिल्हयातील काँग्रेस नेत्यांचा उल्लेख सन्मानपूर्वक करावा. असं म्हंटल आहे.