पाचवडेश्वरला उद्या काँग्रेसचे जिल्हास्तरीय नवसंकल्प शिबीर ; डॉ. सुरेश जाधव यांची माहिती

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत 'नवसंकल्प शिबीर' आयोजित केले जात आहेत. उदयपूर येथे राष्ट्रीय शिबीर पार पडले. त्यानंतर शिर्डी येथेही नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्यस्तरीय शिबीर संपन्न झाले आहे.

    कराड : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत ‘नवसंकल्प शिबीर’ आयोजित केले जात आहेत. उदयपूर येथे राष्ट्रीय शिबीर पार पडले. त्यानंतर शिर्डी येथेही नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्यस्तरीय शिबीर संपन्न झाले आहे. आता जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन केले जात असून पाचवडेश्वर ता. कराड येथे १४ जून रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

    काँग्रेस नवसंकल्प शिबीराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, सरचिटणीस राजेंद्र शेलार, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, विद्या थोरवडे, झाकीर पठाण, प्रा. काटकर यांची प्रमुख उपस्थित होते.

    डॉ. जाधव म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान असून देश महासत्तेकडे जाण्याच्या दृष्टीनेही पक्षाने मोठे प्रयत्न केले. परंतु, गेल्या काही वर्षात देशाची मोठी पीछेहाट झाली आहे. या परिस्थितीतून देशासह पक्षाला उभारी देण्यासाठी व त्यानुसार चर्चेतून रणनीती ठरवण्यासाठी उदयपुर येथे नवसंकल्प कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये संघटन, राजकीय, आर्थिक, शेतकरी, सामाजिक न्याय आणि युवा समूह असे एकून ६ गट तयार करण्यात आले. त्यामाध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेत त्यातून योग्य मार्ग काढण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. नुकतेच शिर्डी येथेही १ व २ जून रोजी शिबीर संपन्न झाले. त्यामध्ये राज्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा पातळीवर शिबीर घेऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवडेश्वर येथील आनंद मंगल कार्यालयात १४ जून रोजी जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांची नवसंकल्प शिबीर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत ३५० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या माध्यमातून तातुका स्तरावर व विभागवार कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.