शिक्षक संघटनेच्या एजंटगिरीने हैराण, माध्यमिक शिक्षण विभागात तोबा गर्दी, कामकाज करणे कर्मचाऱ्यांना झाले कठीण

शिक्षक संघटनेच्या एजंटगिरीमूळे माध्यमिक शिक्षण विभाग हैराण झाले असून, शुक्रवारी संध्याकाळी अर्थपूर्ण फायली काढण्यासाठी विविध शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची धडपड दिसून आली. शिक्षकांच्या तोबा गर्दीमूळे कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे.

    सोलापूर (शेखर गोतसुर्वे) : शिक्षक संघटनेच्या एजंटगिरीमूळे माध्यमिक शिक्षण विभाग हैराण झाले असून, शुक्रवारी संध्याकाळी अर्थपूर्ण फायली काढण्यासाठी विविध शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची धडपड दिसून आली. शिक्षकांच्या तोबा गर्दीमूळे कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. कामकाज होत नसल्याची ओरड करित प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यानी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे केली आहे.

    माध्यमिक शिक्षण विभागात काम करून घेण्यासाठी तोबा गर्दी झालेली रोजच पहायला मिळत आहे. माजी शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्यानंतर शिक्षणाधिकारी पदाबाबत सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. तृप्ती अंधारे यांनी पदभार स्वीकारताचं कामकाजाचा सपाटा लावला. कामकाज जोर धरत असताना कर्मचारी लिपीकांना शिक्षक संघटनेकडून कोंडीत धरण्यात येत असल्याने प्रशासकीय कामकाजाला फटका बसत आहे. गेल्या अनेक महीन्यांपासून विविध कामे प्रलंबीत राहत आहेत.

    राज्यस्तरावर अनेक कामामध्ये माध्यमिक विभागाचा गौरव करण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागात अनेक प्रश्न अनेक महिन्यापासून प्रलंबित असताना संघटनेचे अनेक पदाधिकारी फक्त मलिद्याच्या फाईलींसाठी अधिकाऱ्यांवर दबाब निर्माण करत असल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. सध्य स्थितीध्ये कार्यालयाचे कामकाज ढेपाळलेल्या स्थितीत आहे. नविन आणि अपुरा कर्मचारी वर्ग आणि समोर असलेला कामाचा प्रचंड व्याप यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होत आहेत मात्र यात तुर्तास तरी यश मिळालेलं नाही.

    शंभरच्या वर कोर्ट केसेस, माहिती अधिकार प्रकरणे, पेन्शन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, युडायस+, आधार व्हॅलिडेशन, मेडिकल बीले, सेवा हमी कायदा, अनुकंपा प्रकरणे, परिक्षांचे नियोजन, विद्यार्थी लाभाच्या योजना, शिक्षक समायोजन, संच मान्यता दुरूस्ती आणि सर्वात तापदायक ठरलेले शालार्थची प्रकरणे असे अनेक महत्वाची कामे सध्या प्रलंबित आहेत. विद्यार्थी गुणवत्तेबाबत, चौकशाबाबत तर कुणीही अवाक्षर काढायला तयार नाही. शिक्षक संघटनांच्या अजेंड्यावर गुणवत्तेपेक्षा सोयीची कामे करून घेण्यात आघाडीवर आहेत.

    राज्यात सोलापूरची खराब झालेली प्रतिमा बदलायची असेल तर अधिकाऱ्यांना वेळ देणे, कामाची सुसंगती लावणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे व सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे. सकाळपासून ते रात्री उशीरापर्यतं माध्यमिक विभाग माणसांनी गच्च भरलेला पहायला मिळतो आहे. कारकुनांना काम करू देण्याऐवजी त्यांचाभोवती गराडा- गर्दी करून दबाव टाकून कामे करून घेतली जात आहे. फायली बघू न देता सह्या करून घेण्यावर संघटनांचा जोर आहे. स्वतः कारकुनासारखे हातात फायली घेवून हे संघटनांचे प्रतिनीधी फिरताना दिसत आहेत.