जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होणार

आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या १३९ जागा आणि ४६ प्रभागांचा कच्चा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

    पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या १३९ जागा आणि ४६ प्रभागांचा कच्चा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
    फेब्रुवारी – मार्च २२ मध्ये राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत १३९ जागांसाठी ४६ प्रभाग असतील. त्यात ४५ प्रभाग तीनसदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रासाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, ६ डिसेंबररोजी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे कच्चा प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याची छाननी करण्यात आली.
    रस्ते, चतु:सीमा, नदी – नाले याबाबतच्या नियमांचे पालन झाले का याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर म्हणजे २० डिसेंबरपर्यंत प्रभाग रचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, प्रभाग रचना जाहीर झाली नाही. मात्र, निवडणूक आयोगातील सुत्रांच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर हरकती आणि सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटाचे आरक्षण टाकले जाईल.
    मार्चमध्ये निवडणुका
    जानेवारीत प्रभाग रचना जाहीर झाल्यास मार्चमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२२ पर्यंत मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.