गणेशाेत्सवात यंदा ५ दिवस डीजे; गौरी विसर्जनापासून रात्री १२ पर्यंत परवानगी

सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येईल, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

  पुणे : सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येईल, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

  गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयाेजित बैठकीत त्या बाेलत हाेत्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, उपआयुक्त संदीप गिल व आर राजा, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर, विभागीय उपायुक्त वर्षा उंटवाल, जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कासगावडे आदी उपस्थित होते.

  उत्सवासाठी काढलेल्या परवान्यांची मुदत सन २०२६ पर्यंत

  सार्वजनिक गणेश मंडळांनी मागील वर्षी उत्सवासाठी काढलेल्या परवान्यांची मुदत सन २०२६ पर्यंत असल्याने त्यांनी नव्याने अर्ज करू नयेत, मात्र ज्यांनी मागील वर्षी परवानगी घेतली नाही त्यांना नव्याने अर्ज करावा लागेल. नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आणि पोलिस आयुक्त कार्यालय यांच्याकडे द्याव्यात, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

  दहीहंडी सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सुरक्षितेतच्या दृष्टीने मंडळाला मार्गदर्शनपर प्रात्यक्षिके घेण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

  गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक

  प्रशासकीय बैठकीनंतर डॉ. गोऱ्हे यांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. प्रशासनाबरोबर चर्चा करून या अडचणींचे निराकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीवर शहरातील काही मोठ्या मंडळांनी बहिष्कार टाकला होता. मंडळांच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर नियम केल्याचा निषेध म्हणून हे प्रतिनिधी बैठकीला गेले नाहीत.

  यावेळी शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) शहरप्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय बाप्पू भोसले, युवासेना सचिव किरण साळी, तसेच नीलेश गिरमे, श्रीकांत पुजारी, महिला पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.