चक्क केसांमध्ये साकारले ज्ञानेश्वर माऊली; पंढरपुरातील कलाकाराची अनोखी कलाकृती

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) गेली दोन वर्ष पंढरपूरसह अनेक ठिकाणच्या यात्रांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा प्रथमच पंढरपूरची सर्वात मोठी आषाढी यात्रा जवळ आलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे.

    पंढरपूर : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) गेली दोन वर्ष पंढरपूरसह अनेक ठिकाणच्या यात्रांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा प्रथमच पंढरपूरची सर्वात मोठी आषाढी यात्रा जवळ आलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. यामुळे पंढरपुरातील भाविक गुरू राऊत यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा डोक्यातील केसांमध्ये साकारण्यासाठी पंढरपुरातील नाभिक तुकाराम चव्हाण यांना सांगितले. त्यांनी आपल्या अनोख्या कलाकृतीतून हुबेहूब ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा साकारून एकप्रकारे संतांची मनोभावी पूजा केलेली आहे.

    यापूर्वी राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे शहराध्यक्ष असलेल्या तुकाराम चव्हाण यांनी भारतमाता, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, वर्ल्ड कप, रिक्षा, कॅमेरा, फुटबॉल यांच्यासह अनेक कलाकृती साकारलेल्या आहेत.

    तुकाराम चव्हाण म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. मात्र, श्री पांडुरंगाच्या कृपेने व संतांनी घालून दिलेल्या शिकवणीचे आचरण केल्यामुळे अशा महाभयंकर महामारीमध्ये ही जीवंत राहू शकलो, याची उतराई करण्यासाठी मी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा केसात कोरली असल्याची भावना व्यक्त केली.