काहीही करा, लोक  भाजपमध्ये आणा..! काँग्रेस मेळाव्यानंतर सोलापुरात उलटी गिनती सुरू

काँग्रेसच्या निर्धार महामेळाव्यानंतर सोलापुरात भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून, यादरम्यान भाजपमध्ये इतर पक्षातील लोकांना दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.      

  सोलापूर : काँग्रेसच्या निर्धार (congress)महामेळाव्यानंतर सोलापुरात भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून, यादरम्यान भाजपमध्ये इतर पक्षातील लोकांना दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात काँग्रेसचा महानिर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना निम्बर्गी यांनी सोलापुरातील भाजपमध्ये चाललेल्या गटबाजीची पोलखोल केली. त्यामुळे भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. अशात यापूर्वी दोन वेळा रद्द झालेला फडणवीस यांचा दौरा गुरुवारी फायनल झाला आहे. फडणवीस यांच्या दौऱ्यात भाजपचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात इतर पक्षातील नवीन कार्यकर्ते आणा, असा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून संदेश आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी रात्री भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत
  महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे  माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे निम्बर्गी यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी पाण्याच्या मुद्द्यावरच भाजप सत्तेवर आले होती पण गेल्या पाच वर्षात भाजपला हा प्रश्न सोडवता आला नाही. गटतटाच्या राजकारणात विकासाच्या प्रश्नाला बगल दिली गेली. नेमका हाच फायदा उचलण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे.
  भाजपला सत्तेची धुंदी..
  सोलापुरात महापालिका व जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता राहिली. पण या सत्तेचा भाजपला उपयोग करून घेता आला नाही. जिल्हा परिषदेच्या अनेक कामांबद्दल तक्रारी झाल्या. पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे शहरातीलही महापालिकेच्या प्रश्नांबाबत नागरिकांची मोठी ओरड आहे. आता नेमका याचाच फायदा विरोधकांना होत असल्याचे दिसून आले आहे.
  पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष…
  मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकार सत्तेवर आल्यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना जबाबदारी देण्यात आली. तसे पाहिले तर विखे -पाटील मुरब्बी राजकारणी आहेत. पण याचा फायदा अजून तरी सोलापूर जिल्ह्याला झालेला नाही. फक्त बैठका घेण्यापुरतेच त्यांचे आतापर्यंतचे कामकाज राहिले आहे. जलजीवन मिशन हा मोदी सरकारचा मोठा उपक्रम आहे. सोलापूर जिल्ह्यात जलजीवनच्या कामावर मोठी ओरड झाली. पालकमंत्री विखे- पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. पण नंतर ही योजना व्यवस्थितपणे राबवून घेण्यात भाजपला अपयश आले आहे. भाजपच्या मित्र पक्षाकडे आरोग्यमंत्र्याचे पद आहे पण सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य खात्याची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व चौकशी करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत सिव्हिल हॉस्पिटल मधील सिटीस्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे गरिबांना खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील अप्रतिनिधी व सरकारला वेळ नाही. नव्याने तयार करण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन राखडले आहे. या यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे होते. त्यांच्या कामाचा चांगला ठसा जिल्ह्यात दिसून येत आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली. पदभार घेतल्यापासून पक्षीय विस्तार वाढविण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने इतर पक्षातील नेते भाजपला गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. पण यात भाजपला कितपत यश मिळणार हे लवकरच दिसून येणार आहे.