
सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यांचे त्याग, बलिदान सर्वांना माहिती आहे. त्यांनी देशासाठी काम केले. त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. राहुल गांधी अवमान करण्याचे काम करत आहेत. देशाप्रती विरोधात बोलत आहेत. आमची सावरकरांवर श्रद्धा आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगावातील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाष्य केले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले, ‘सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यांचे त्याग, बलिदान सर्वांना माहिती आहे. त्यांनी देशासाठी काम केले. त्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. राहुल गांधी अवमान करण्याचे काम करत आहेत. देशाप्रती विरोधात बोलत आहेत. आमची सावरकरांवर श्रद्धा आहे. गर्व आहे. ते आमच्या देशवासियांचे दैवत होते. त्यांचा अवमान करणे म्हणजे पूर्ण देशाचा अवमान करणे असा आहे, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींचा निषेध करावा तेवढं कमी
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढं कमी आहे. राहुल गांधी या देशाची निंदा परदेशात जाऊन करत आहेत. सावरकरांचा अवमान करणाऱ्या या वृत्तीचा निषेध करतो. ते वारंवार अवमान करत आहेत. परदेशात जाऊन देशाची निंदा करणं चुकीचं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार
मालेगावच्या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे सहन करणार नाही म्हणजे काय करणार? असा सवाल पत्रकारांनी विचारायला हवा. बोलून काय होणार नाही. कृतीतून दाखवा, असेही त्यांनी म्हटले आहे.