‘कच्च्या कैद्यांशी गैरवर्तन करू नका’; विशेष न्यायालयाची कारागृह अधीक्षकांसह सुरक्षारक्षकांना ताकीद

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाचा दानिश अलीने (Danish Ali) आर्थर रोड कारागृहातील सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करून इतर कैद्यांसमोर नग्न केल्याच्या आरोप केला. त्याची विशेष न्यायालयाने (Special Court) गंभीर दखल घेतली आणि कच्च्या कैद्यांशी गैरवर्तन करू नका तसेच अशा प्रकारांची पुनरावृत्ती नको, अशी ताकीद कारागृहाचे अधीक्षक आणि कारागृहातील सुरक्षारक्षकांना दिली आहे.

    मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाचा दानिश अलीने (Danish Ali) आर्थर रोड कारागृहातील सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करून इतर कैद्यांसमोर नग्न केल्याच्या आरोप केला. त्याची विशेष न्यायालयाने (Special Court) गंभीर दखल घेतली आणि कच्च्या कैद्यांशी गैरवर्तन करू नका तसेच अशा प्रकारांची पुनरावृत्ती नको, अशी ताकीद कारागृहाचे अधीक्षक आणि कारागृहातील सुरक्षारक्षकांना दिली आहे.

    दानिशला दाऊद टोळीशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली असून, तो माफीचा साक्षीदार झाला आहे. न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत, कारागृहातील सुरक्षारक्षक अनिल इंगळे यांनी अन्य कैद्यांच्या उपस्थित आपल्याशी गैरवर्तन केले. आपल्याला फक्त शिवीगाळ न करता न्यायालयातून पुन्हा कारागृहात आणल्यावर झडती घेताना नग्न होण्यास सांगितल्याचा आरोप दानिशने केला होता. तसेच त्याच्या आरोपांच्या समर्थनार्थ कारागृहातील झडती घेण्यात येणाऱ्या खोलीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली होती.

    कारागृह अधिकाऱ्यांना आपली झडती घेण्याचा अधिकार असला तरीही इतर कैदी आणि कर्मचाऱ्यांसमोर नग्न करून आपली झडती घेऊन अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप करून इंगळे यांना नग्न झडती घेण्याचा किंवा अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. त्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याबद्दल इंगळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दानिशने केली होती.

    दानिशच्या आरोपांची दखल घेऊन न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे, तर इंगळे यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. इंगळेंकडून दानिशच्या आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच झडती घेताना त्याच्याकडे चिट्ठी सापल्याची बाब लपवण्यासाठी दानिशने आपल्यावर आरोप केल्याचा दावा इंगळेंनी केला. मात्र, दानिशच्या आरोपांत तथ्य आढळून आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु, इंगळे यांच्या गैरवर्तनाची चौकशी करण्याऐवजी अशा प्रकारांची पुनरावृत्ती नको, अशी ताकीद कारागृह अधीक्षक आणि इंगळे देऊन न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.