नायजेरियन आणि इराणी महिलांचा सुरु आहे कल्याणमध्ये ड्रग्सचा धंदा, पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

चौघांकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहेत.

    कल्याण : कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. कल्याण कोलशेवाडी पोलिसांनी ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकांसह दोन आरोपींना अटक केली आहे. तर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कल्याण जवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला अटक केली आहे. या चौघांकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहेत. चुकवूईमेका इमेका असं नायजेरियन ड्रग्स तस्कराचे नाव आहे. सनील यादव, युवराज गुप्ता, इराणी महिला फाजी इराणी अशी तीन अटक आरोपींची नावं आहेत. कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करीच्या रॅकेट नायजेरियन नागरिक आणि इराणी महिलांच्या साहाय्याने हा धंदा चालवला जात आहे हे आता उघड झाले आहे.

    कल्याण डोंबिवली परिसरात नशेखोरांचा वावर वाढला होता. अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर बीजेपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कोळशेवाडी पोलीस व खडकपाडा पोलिसांनी ड्रग्स तस्करांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथे नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका रिक्षामध्ये दोघजण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांना बघून या रिक्षाचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करत ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव व युवराज गुप्ता या दोन जणांची झडती घेतली.

    या दोघांजवळ एम डी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एम डी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. कोळशेवाडी पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा रचला आणि या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहेत. तर खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पद रीत्या फिरताना आढळून आले पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. फिजा इराणी असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी फिजा इराणी हिला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.