घरगुती गॅसचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकपणे चोरून गॅस काढून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे.

    पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकपणे चोरून गॅस काढून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. गॅस सिलेंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे. शरद काशिनाथ पाटील (वय २४, रा. रुपीनगर, तळवडे), सुशांत तानाजी घाडगे (वय ४३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अर्जुन रामचंद्र नरळे (वय ४०, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरु

    पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी आणि दत्तवाडी आकुर्डी भागात काही गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सूर्या गॅस सर्विस, गणेश कामगार नगर, दत्तवाडी आकुर्डी आणि क्रिष्णा गॅस सर्विस, आझाद चौक, ओटास्कीम निगडी या ठिकाणी सापळा लाऊन कारवाई केली. गॅसरिफिलिंग करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

    सुशांत घाडगे हा सरस्वती गॅस एजन्सी, संभाजीनगर येथे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. ग्राहकांनी बुक केलेले सिलेंडर त्यांना न देता ते सिलेंडर सूर्या गॅस सर्विस, दत्तवाडी, आकुर्डी येथील शरद पाटील याला विकत असे. शरद पाटील हा लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत असे. तसेच क्रिष्णा गॅस सर्विस ओटास्कीम निगडी येथे अर्जुन रामचंद्र नरळे हा देखील लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत असे.

    आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    पोलिसांनी आरोपींकडून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, लहान सिलेंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार दीपक खरात, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, संदेश देशमुख, उद्धव खेडकर, आतिश कुकडे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली.