गारगोटीच्या ज्योतिर्लिंग गणपती मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या

गारगोटीच्या जोतिर्लिंग मंदिर व गणपती मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे २० हजारची रोकड लंपास केल्याची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली.

    भुदरगड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गारगोटीच्या जोतिर्लिंग मंदिर व गणपती मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे २० हजारची रोकड लंपास केल्याची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जूनच्या रात्री ९.३० ते १० जुनच्या पहाटे ३.१५ या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने जोतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपातील दानपेटीचे कुलूप व साखळी तोडून अंदाजे रू १५ हजार रोकड चोरली. तसेच शेजारील गणपती मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे ५ हजार रुपये रक्कम चोरल्याची तक्रार भुदरगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली.

    याबाबतची तक्रार मंदिराचा पुजारी संदिप बापू गुरव (वय ४५) याने दिली. दरम्यान, ही बातमी सकाळी सर्वत्र पसरताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. पोलीसांनी शोधमोहिम राबवली. श्वानपथकाच्या साहाय्याने शोध घेतला. पण अद्याप यश आले नाही. मंदिरात नव्याने दुसरी एक दानपेटी उभारण्यात आली. ती पेटी मात्र चोरटे फोडू शकले नाहीत.

    याबाबत अधिक माहिती सांगताना मंदिराच्या देवस्थान समितीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण म्हणाले की, जोतिर्लिंग मंदिरीची वास्तूशांती गेल्या महिण्याच्या अखेर झाली. लाखो लोक या सोहळ्यास उपस्थीत होते. त्यामुळे दानपेटीत किती रक्कम असावी याचा अंदाज बांधता येत नाही. आज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून वास्तूशांतीच्या जमाखर्चाचा हिशेब देणार होतो. मात्र, चोरट्याने पाळत ठेवून आदल्या रात्रीच दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याने आम्ही हतबल झालो आहोत.

    पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक सतिश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास सुरू आहे.