विद्यार्थ्यांचे गृहपाठ रद्द करू नका; हिंदू महासंघ पालक आघाडीची मागणी

प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा गृहपाठ रद्द करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे, हा निर्णय मागे घ्यावा, पुनर्विचार करावा,अशी भूमिका हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने मांडली आहे.

    पुणे : प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा गृहपाठ रद्द करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे, हा निर्णय मागे घ्यावा, पुनर्विचार करावा,अशी भूमिका हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने मांडली आहे. पालक आघाडी आणि पुणेकर पालकांच्या प्रतिनिधींनी ही भूमिका व्यक्त केली. शिक्षण मंत्र्यांची भेट मागितली असून त्यांच्याकडे या निर्णयाच्या पुनर्विचार करण्याची मागणी करणार आहोत, असे पत्रकार परिषदेत म्हणाले.

    शाळेत अल्प वेळेत आणि घाईघाईने शिकवलेला प्रत्येक विषय प्रत्येक विद्यार्थ्यांना कळेलच असे नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची स्मरणशक्ती आणि बुद्धीमत्ता वेगळी असते, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे प्रत्येक शिक्षकाला शक्य नसते, घरी जाऊन अभ्यास करण्याची सवय लागणे त्यांना लहान वयातच अत्यंत आवश्यक असताना आणि कोणीही मागणी न करता, कोणताही आढावा न घेता कोणताही अभ्यास न करता सरकार हा निर्णय घेत आहे. त्यातून सरकार विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक आयुष्यच नव्हे तर भवितव्यच धोक्यात घालत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. शासनाने कोणताही निर्णय घेण्याआधी पालकांबरोबर सुद्धा चर्चा करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

    दरम्यान यावेळी पालक आघाडीचे कौस्तुभ पोंक्षे, ‘देसी ‘ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मराठे, आसावरी दिवाण, प्रिया भोंडवे, प्रा. भूपेंद्र शुक्ला, विद्या घटवाई, तृप्ती तारे उपस्थित होते.