अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, आता महाराष्ट्र काँग्रेस प्रभारींनी आमदारांना दिला इशारा; ‘क्रॉसव्होटिंग कराल तर…’

अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नेता ते मंत्रिपदापर्यंत सर्व काही दिले. त्यांनी अचानक पक्षाला का सोडले याचे कारण तर त्यांनी सांगितले पाहिजे. आयाराम-गयाराम करणाऱ्यांना जनता किंमत देत नाही.

    मुंबई : अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नेता ते मंत्रिपदापर्यंत सर्व काही दिले. त्यांनी अचानक पक्षाला का सोडले याचे कारण तर त्यांनी सांगितले पाहिजे. आयाराम-गयाराम करणाऱ्यांना जनता किंमत देत नाही. चव्हाण यांनी काँग्रेसला सोडले तरी त्यांच्यासोबत कोणताही आमदार, नेता, काँग्रेस सोडून जाणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी व्यक्त केला. आम्ही एकसंध होऊन काम करणार आहोत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

    डरपोक लोक पक्ष सोडत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने असे केल्यास त्याला सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात येईल. केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाण यांनी पक्ष सोडला, मात्र त्यांच्या जाण्याने पक्ष अजिबात कमकुवत होणार नाही, कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत, असे चेन्निथला यांनी सांगितले.

    कारण गुलदस्त्यातच

    दोन दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते. पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी ते आघाडीच्या जागावाटपात सोबत होते, पण रात्रीतूनच त्यांनी पक्ष का सोडला असा सवाल आम्हा सर्वांना आहे. मुख्यमंत्री, मंत्री, सर्व पदे त्यांना दिली, तरीही त्यांनी पक्ष का सोडला हे आम्हाला समजले नाही. जे लोक पक्ष सोडून जातात, त्यांना जनता धडा शिवकते.

    रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस.