
इंदापूर : मायबाप मराठ्यांनो ही संधी सोडू नका, आजची संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचे पुण्याचं पुण्यांचं दान टाकू लागा, ही मागणी करण्यासाठी आणि आपले आशीर्वाद घेण्यासाठी इंदापूरला आलो आहे.अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी घातली आहे. शनिवारी (दि. २१) इंदापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
हजारोंच्या संख्येने जमला जनसमुदाय
तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवानी केले. भाषणास सुरुवात करण्यापूर्वी संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले.
कोणीच मागे राहू नका
मराठ्यांचे आंदोलन रोखू शकेल अशी एकही शक्ती राज्यात आणि देशात नाही फक्त आंदोलन शांततेत करा. उद्या २२ तारखेला महाराष्ट्रातील मराठा समाजाला आंदोलनासंदर्भात दिशा दिली जाणार आहे. तुम्ही तयारीला लागा. बेसावध होऊ नका, सगळे सावध व्हा. इथे माझ्या स्वतःचा विषय नाही तर घराघरातल्या मराठ्यांचा आहे. त्यामुळे कोणीच मागे राहू नका हे आंदोलन शांततेत करायचे आहे, उग्र नाही. उग्र आंदोलनास आपलं समर्थन नाही. आरक्षण कसे भेटत नाही त्याची तुम्ही काळजी करू नका, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा बांधवाना जाहीर आवाहन
उद्यापासून गावंच्या गावे जागरूक करा. मराठ्यांना पुन्हा जागे करा.आता आपली सुद्धा कसोटी आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. आंदोलन शांततेत करायचे आहे. कोणीही उद्रेक, जाळपोळ करायचा नाही. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवर केसेस झाल्या तर त्यांना शिक्षणात आणि नोकरीत अडचणी येतील. तुमचा विषय फक्त आरक्षणाचा आहे.शांततेच्या युद्धाने सरकार जेरीस आले आहे. महाराष्ट्रातील एकाही मराठ्यांच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरच मारायला लागली तर हे आरक्षण घ्यायचे कोणाला आणि द्यायचे कोणाला असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना जाहीर आवाहन केले.
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
आम्हाला रक्तबंबाळ केले. आमच्या बहिणींची डोकी फोडली तो हल्ला अंतरवाली वर नव्हता तो समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजावर होता. त्या किंकाळ्या ऐकण्यासारख्या नव्हत्या. लोकशाहीच्या आणि कायद्याच्या अधीन राहून हे आंदोलन होते. तरी सरकारने हा हल्ला घडवून आणला. परंतु आम्ही डगमगलो नाही,आजही ते आंदोलन शांततेत सुरू आहे. आता तुमच्या छताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमच्या संयमाचा विचार सरकारला करावा लागेल. आम्ही मागे हटणारे मराठे नाही अफगाणिस्तानपर्यंत मराठ्यांनी झेंडे फडकवले आहेत. तुमचा उलटा-सुलटा कार्यक्रम मराठे करतील आता तरी शुद्धीवर या, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
आपलीच माणसे आपल्या विरुद्ध उठवायचे कारस्थान
ग्रामीण भागातील ओबीसी, धनगर, मुस्लिम, दलित बांधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रत्येकाला वाटते गोरगरीब पोराला आरक्षण मिळाले पाहिजे. आपण सरकारला एक महिन्याचा वेळ दिला, जास्तीचे दहा दिवस दिले. २४ तारखेला सरकारचे ४० दिवस पूर्ण होत आहेत. बहुतेक आपलीच माणसे आपल्या विरुद्ध उठवायची ठरवले आहे. तो पण डाव आता हाणून पाडायचा असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.