‘नवराष्ट्र’ इम्पॅक्ट! विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका ; तहसीलदारांची तंबी,  पालिकेने दिला चार तासात ना हरकत दाखला

  राहुरी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या ‘तू तू मै मै’ मध्ये येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दै. नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध होतच प्रशासन खडबडून जागे झाले. राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, बीडीओ बाळासाहेब ढवळे, गट शिक्षण अधिकारी अर्जुन गारुडकर, मुख्याधिकारी अजित निकत, इंजिनियर सुरेश मोटे, अकोलकर आदी अधिकाऱ्यांसह आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, बाळासाहेब खुरूद आदींनी त्या शाळेकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.  दरम्यान,  नगरपरिषदने ही इमारत बांधून दिली आहे.  त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. चोवीस तासात आराखडा  तयार करा व ४८ चाळीस तासात प्रस्ताव दाखल करा, असे आदेश तहसीलदार शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
  तातडीने इमारत दुरुस्ती करा विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळू नका, अशी तंबीही  तहसीलदार यांनी दिली.

  -इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘ना हरकत दाखला’ दिला
  नगरपरिषदने १९९२ साली जिल्हा परिषद जागेवर  ही शाळा  इमारत बांधून  दिली.  मात्र,  शिक्षण विभागाने तब्बल ३० वर्ष उलटूनही ही इमारत आजतागायत ताब्यात घेतली नाही. या इमारतीप्रमाणेच वाड्या वस्त्यावरील शाळांचाही असाच तिढा असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याने नगरपलिका लवकरच सर्व जागा व इमारती जिल्हा परीषदकडे हस्तांतरण करणार असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले. तर या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘ना हरकत दाखला’ तातडीने देण्यात आला आहे.

  -महिनाभरात मुख्याध्यपकाच्या  नेमणूक
  याच ठिकाणच्या उर्दू माध्यम शाळेच्या थकीत बिलाबाबत विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वीज  खंडित न करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या. महिनाभरात मुख्याध्यपकाच्या  नेमणूक करण्यात येईल, अशी ग्वाही गट शिक्षण अधिकारी अर्जुन गारुडकर यांनी दिली.

  -नवीन शाळा इमारतीची उभारणी करा  
  या शाळेसोबत खुरूद वस्ती शाळेसह वाड्या वस्त्यावरील शाळांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी माजी नगरसेवक बाळासाहेब खुरूद यांनी यावेळी केली.  तर सुरेंद्र थोरात यांनी धोकादायक झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी  नवीन इमारती बांधून देण्याची विनंती  केली. या शाळा नगर परिषद हद्दीत येत असल्याने जिल्हा परिषद दुजाभाव करित असल्याचा आरोप केला.

  अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाचे वृत प्रसिद्ध करून विद्यार्थी  व शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल अनेक पालक व शिक्षक वृंदानी दै. नवराष्ट्रचे आभार मानले. तसेच नवराष्ट्रच्या जागरूक पत्रकारितेचे प्रशंसा केली आहे. शाळा समितीचे सदस्य फिरोज शेख, कुमार भिंगारे, माऊली भागवत शिक्षक यावेळी उपस्थित होते.