अमली पदार्थ विरोधी पथकाची दुहेरी कारवाई, तिघांना ठोकल्या बेड्या; सव्वा सहा लाखांचा ऐवज पकडला

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दुहेरी कारवाई करत गांजा तसेच एलएसडी पेपर या अमली पदार्थांसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सव्वा सहा लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

    पुणे : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दुहेरी कारवाई करत गांजा तसेच एलएसडी पेपर या अमली पदार्थांसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सव्वा सहा लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. केसनंद तसेच येरवडा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    पहिल्या कारवाईत विजय रमेश शेलार (वय ३७) तसेच दिपक अशोक मोहिते (वय २१, रा. दोघेही नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम गांजासह साडे पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    शहरात अमली पदार्थ तस्कारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. तरीही तस्कर छुप्या पद्धतीने माल पुरवत असल्याचे वास्तव आहे. यादरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी केसनंद फाटा येथील वाडेबोलाई रोड परिसरात दोघेजन गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार येथे सापळा रचला.

    तसेच, या दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पोत्यात २१ किलो २०० ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी शुभम कैलास भोरकडे (वय २५, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून एलसीडी पेपर हा अमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा एकूण १ लाख ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांकडून तिघांकडे कसून तपास केला जात आहे.