हुंडा अन् वंशाच्या दिव्याचा हव्यास काय जाईना अन् महिलांवरील अत्याचार काय थांबेना

हुंडा अन् वंशाच्या दिवा ही बुरसटलेली विचारसरणी समाजात खोलवर रुजली आहे. या दोन कारणांसाठी आजही महिलांचा छळ केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभर दररोज याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत.

    पिंपरी : हुंडा अन् वंशाच्या दिवा ही बुरसटलेली विचारसरणी समाजात खोलवर रुजली आहे. या दोन कारणांसाठी आजही महिलांचा छळ केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभर दररोज याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या ठाण्यांमध्ये तब्बल 292 गुन्हे दाखल आहेत.

    मूल होत नसल्यानेदेखील विवाहितांचा छळ केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे, महिला सेलकडे येतात. मात्र, मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते, तर पुरुषामध्येही काही कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, मूल होत नसल्यास 35 टक्के कारणे महिलेशी संबंधित असतात. 30 टक्के कारणे पुरुषांशी संबंधित असतात. 20 टक्के दोघांमध्ये दोष असतो व 15 टक्के दाम्पत्यांमध्ये कारण समजत नाही. मुलगा किंवा मुलगी होणे, हे पूर्णपणे पतीवर अवलंबून असते. यामध्ये पत्नीची काहीही चूक नसते.

    महिला सेलकडेही तक्रारी

    महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये महिला सेल कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्रकारे महिलांचा छळ होत असल्याच्या तक्रारी दररोज या सेलकडे प्राप्त होतात. यामध्ये हुंडा, मूल न होणे या कारणांसाठी छळ होत असल्याच्यादेखील तक्रारी आहेत.

    उच्चशिक्षितांचाही सहभाग

    हुंडा आणि मुलगा न होण्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ करण्यामध्ये अशिक्षितांसोबत उच्चशिक्षितांचाही सहभाग आहे. त्यामुळे याबाबत समाजामध्ये अजूनही जनजागृती करण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात विवाहितेच्या छळप्रकरणी एकूण 292 गुन्हे दाखल आहेत.