महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रशांत पोतदार यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार जाहीर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वसा आणि वारसा निष्ठेने जोपासल्याबद्धल स्नेहालय संस्थेमार्फत डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पोतदार यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, संतोष धर्माधिकारी व अजय वाबळे यांनी दिली. 

    सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वसा आणि वारसा निष्ठेने जोपासल्याबद्धल स्नेहालय संस्थेमार्फत डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पोतदार यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, संतोष धर्माधिकारी व अजय वाबळे यांनी दिली.

    हा पुरस्कार बुधवारी (दि.१५) ग्राम इसळक, जि. अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या जयते ग्राम प्रकल्पात दुपारी दीड वाजता आयोजित कार्यक्रमात महामानव डॉ. बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सहकारी, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आणि मुंबई येथील आनंदवन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री आणि मेस्त्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. देशातील नव्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी म्हणून रस्त्यांवरील बेवारस मनोरूग्णासाठी देशात पथदर्शी काम करणारे चिखली (जि.बुलढाणा) येथील सेवा संकल्प संस्थेचे संस्थापक डॉ. नंदू पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात रोख रुपये १० हजार व स्नेहालयमधील लाभार्थींनी बनवलेली कलाकृती, पुस्तके आणि सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे १९९१ ते १९९५ पर्यंत स्वीय सहाय्यक ते आजपर्यंत गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रात अंनिसच्या विविध पदांवर सक्रियपणे मोठे काम प्रशांत पोतदार यांनी केले आहे. महाराष्ट्रातील देव-धर्माच्या नावाने फसवणूक करणाऱ्या अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश करणे असेल अथवा शाळा, महाविद्यालये, गाव वस्त्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे हजारो कार्यक्रम प्रात्यक्षिकासह त्यांनी सादर केले आहेत. हे कार्य अविरत करत राहणे ही त्यांची जीवननिष्ठा ठरली आहे.

    सध्या ते सातारा येथून महाराष्ट्र अंनिसचे मध्यवर्ती कार्यालयातून सक्रियपणे कार्यभार सांभाळत आहेत. याबद्धल अंनिसचे सातारा येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, प्रा. कुमार मंडपे, प्रा. जयप्रकाश जाधव, शंकर कणसे, प्रा. प्रमोदिनी मंडपे, जिल्हा प्रधान सचिव ऍड. हौसेराव धुमाळ आदींनी अभिनंदन केले आहे.