डॉ. नितीन राऊतांचे नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत; सोबतच राज्य कॉंग्रेसमंत्र्याच्या फेरबदलांचे संकेत!

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करून भाजपच्या निलंबित केलेल्या १२ आमदारांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रस्तवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आल्याबाबत सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा दोन्ही बाजुने दिला जात नाही.

  मुंबई : राज्य विधानसभेत रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी सोमवारी विधानसभेत अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी आवाजी पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र या पदावर आता कॉंग्रेस पक्षातून केसी पाडवी, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे मागे पडली असून डॉ नितीन राऊत यांचे नाव चर्चेत आले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात येणार असून मंगळवारी सकाळी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल, त्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेतले जाणार आहे.
   
  शेवटच्या दिवशी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव
  विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीने व्हावी, यासाठी मविआ सरकारने अध्यक्ष निवडीच्या नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केल्यानंतर त्याला विरोधकांनी तिव्र विरोध केला होता. या विधेयकाला आता राज्यपालांची संमती मिळणे आवश्यक आहे.  त्यानुसार अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा कार्यक्रम घेण्यास राज्यपालांची अनुमती मिळेल. मंग‌ळवार, २८ डिसेंबरला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी अधिकृत प्रस्ताव सोमवारी विधानसभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  डॉ राऊत अध्यक्षपदासाठी घोषणेची शक्यता

  अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून कॉंग्रेस पक्षात एकमत होत नसल्याने अखेर हायकमांडकडून आदेश दिला जाणार आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर मानले जात होते, मात्र अनुसूचित जाती आघाडीच्या अखिल भारतीय अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून डॉ नितीन राऊत याना मुक्त करण्यात आल्याने त्यांनाच अध्यक्षपदासाठी पक्षाकडून उमेदवारी घोषित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव दिल्लीत पाठविण्यात आला सोमवारी सकाळी अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

  निलंबनावर तडजोड करत निवडणूक बिनविरोध
  दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करून भाजपच्या निलंबित केलेल्या १२ आमदारांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रस्तवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आल्याबाबत सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा दोन्ही बाजुने दिला जात नाही. १२ सदस्यांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. या शिवाय सोमवारी सकाळी मविआ घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक असून त्यात यासा-या प्रश्नी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.