‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून समता, बंधुता, न्याय आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घातला’ – डॉ. राजाभाऊ भैलूमे

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॅालेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. राजाभाऊ भैलूमे यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

    शिरुर : [blurb content=”” या व्याख्यानासाठी महावि‌द्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते. प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भैलूमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना स्पर्श केला.

    भारतामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणायचे असेल तर समतेचे तत्व लागू करावे लागेल. ते तत्व राज्यघटनेतील कायद्यातुन रुजवावे लागेल हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. शोषित वर्गाच्या कल्याणासाठी,तसेच त्यांनी कामगारांसाठी कायदे केले. स्त्रियांनी वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्यासाठी ‘शारदा’ कायदा मंजूर करण्यासाठी योगदान दिले. सर्वांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह केला. गुलामाला गुलामगिरीची जाणिव करून दिल्याशिवाय तो आपले हक्क, मिळवण्यासाठी पेटून उठणार नाही याची जाणिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही त्यांचे चिंतन होते. सामाजिक बदलासाठी समाजमनामध्ये बदल घडवला पाहिजे व हा बदल घडविण्यासाठी शिक्षण हा पाया आहे असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. दलित, बहुजन समाजाला विकसित करायचे असेल तर त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे, कारण ‘शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे’ याची जाणिव त्यांना होती.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी भूषविले.  अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “महामानवांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे स्मरण करून चालणार नाही तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे महत्वाचे आहे. बहुजन समाजासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले होते. महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणासाठी जे कार्य केले त्याचाच वारसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिक्षण संस्था स्थापन केल्या. समाजप्रबोधनासाठी वृत्तपत्रे सुरू केली. कामगारांच्या हक्कासाठी राजकिय पक्षही स्थापन केला. अर्थशास्त्रातही त्यांचे काम उल्लेखनिय आहे. ते एक उत्तम वकिलही होते. असे त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याचे दिसते.” असे किशोर काकडे म्हणाले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप प्रा. संजय जडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. यावेळी ग्रंथालय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. इतिहास विभागातर्फे पोष्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभागातील प्रा. डी. डी. गायकवाड , प्रा. प्रांजली शहाणे तसेच ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे , मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल चौरे, डॉ.संदीप वाकडे, प्रा.अविनाश जाधव यांचे सहकार्य लाभले. सर्व मान्यवरांचे आभार प्रा.गजानन घोडके यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे यांनी केले.