कोणत्याही ठिकाणी दरडी अचानक कोसळत नाहीत तर…: प्रा. डॉ. सतीश थिगळे 

कोणत्याही ठिकाणी दरडी अचानक कोसळत नाहीत तर त्या कोसळण्यापूर्वी निसर्ग धोक्याचा इशारा देत असतो याची लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस, काही तास दिसून येतात.

    पाटण : कोणत्याही ठिकाणी दरडी अचानक कोसळत नाहीत तर त्या कोसळण्यापूर्वी निसर्ग धोक्याचा इशारा देत असतो याची लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस, काही तास दिसून येतात. नागरिकांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व आपला जीव वाचवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगर्भशास्त्र विषयातील तज्ञ प्राध्यापक डॉ. सतीश थिगळे यांनी केले.

    पाटण येथे दरड साक्षरता अभियाननिमित्त पाटण तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांची संभाव्य भूस्खलन होण्यापूर्वी व भुस्खलन झाल्यानंतर काय दक्षता घ्यायची याबाबत महसूल विभागाच्यावतीने पाटण येथे प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, तहसीलदार रमेश पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात, तुषार बोरकर, गटविकास अधिकारी जी. डी. शेलार, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सपोनि एन. आर. गायकवाड, सपोनि संतोष पवार उपस्थित होते.

    देविदास ताम्हणे म्हणाले, पाटण तालुका भूकंपप्रवण तालुका आहे. याठिकाणी वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक ठिकाणी घरांना तडे जातात, हे नैसगिक कारण असलेतरी मानव निर्मिती कारणामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. एखादी दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसल्यास आपण स्वतः सुरक्षितस्थळी जाऊन इरांनाही प्रवृत्त करावे. त्यामुळे होणाऱ्या घटना टाळता येतील आपण विविध घटकांचा अभ्यास करून दक्ष राहून काळजी घेत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार. त्यासाठी पर्यावरणाचा रास आपण रोखायला पाहिजे.

    दरम्यान, प्रांताधिकारी सुनील गाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांनी मार्गदर्शन केले. स्वागत निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांनी केले तर आभार नायब तहसीलदार तुषार बोरकर यांनी मानले.