वाहन चालकांनो सावधान! वाहतूक पोलीस करणार शहरातील प्रत्येक वाहनाची तपासणी; जाणून घ्या नेमकं झालंय काय?

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी 'वाहन तपासणी उपक्रम' हाती घेतला आहे. याअंतर्गत वाहतूक शाखेच्या 20 पथकांकडून ठिकठिकाणी जाऊन वाहनांची तपासणी केली जाणार आहे. वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट बसवून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंधकरण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ‘वाहन तपासणी उपक्रम’ हाती घेतला आहे. याअंतर्गत वाहतूक शाखेच्या 20 पथकांकडून ठिकठिकाणी जाऊन वाहनांची तपासणी केली जाणार आहे. वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट बसवून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंधकरण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

    पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक वसाहती, मोठ्या शिक्षण संस्था असल्याने शहरामध्ये मोठया प्रमाणात परराज्यातून तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून शिक्षण, नोकरी व रोजगारनिमित्त अनेक नागरिक आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात वाहने वापरली जातात. त्यामध्ये दुचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहन चोरी तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर लक्षात घेता अशा घटनांना प्रतिबंध करणे व त्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेमार्फत ई-चलन कार्यप्रणाली अंतर्गत तयार केलेल्या नाकाबंदी अॅपद्वारे वाहन तपासणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

    पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत 14 वाहतूक विभाग आहेत. प्रत्येक विभागातील प्रत्येकी 2 पोलीस अंमलदार यांची एक टीम अशा एकूण 14 टीम व पिंपरी-चिंचवड वाहतूक नियत्रंण कक्षाच्या 6 टीम अशा एकूण 20 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम पिंपरी चिंचवड शहर परिसरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शॉपिंग मॉल, शाळा, उड्डाण पुलाखालील पार्किंग, सोसायटी पार्कीग, बेवारसवाहने इत्यादी ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी नाकाबंदी अॅपद्वारे चेकींग करुन वाहनांची तपासणी करणार आहेत.

    वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले की, शहरात होणारी वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट वापरणे अशा घटनांचा शोध घेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वाहन तपासणी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात 1 डिसेंबर पासून होणार आहे. चोरीची वाहने, नंबर प्लेट बदललेली वाहने आढळल्यास अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.”