जत तालुक्यावर दुष्काळाचे सावट, खरीप वाया; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना मध्यावर आला तरी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. राज्यातील इतर भागातही जवळपास हीच परिस्थिती आहे. बळीराजाने पावसाचा अंदाज घेऊन पेरण्यांचे नियोजन केले. मात्र केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत.

    जत : ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना मध्यावर आला तरी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. राज्यातील इतर भागातही जवळपास हीच परिस्थिती आहे. बळीराजाने पावसाचा अंदाज घेऊन पेरण्यांचे नियोजन केले. मात्र केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यामुळे बळीराजावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. बळीराजाने वरुण राजाची प्रार्थना करूनही वरुणराजा प्रसन्न झाला नाही, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. जत तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.

    मागील १२२ वर्षात ऑगस्ट महिन्यातील सर्वात कमी पाऊस यावर्षी नोंदला गेला. केवळ ऑगस्टच नव्हे तर जून आणि जुलै महिनेही कोरडेच गेले आहेत. मान्सूनपूर्व पावसानेही दगा दिला आहे. मागील तीन महिन्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्याचा विपरित परिणाम पेरण्यांवर झाला आहे. या तीन महिन्यात सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झाला नाही. जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या करण्यास बळीराजा धजावला नाही. परिणामी मराठवाड्यात अद्यापही म्हणाव्या तशा पेरण्या झाल्या नाहीत. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या काळापर्यंत शेतीची बहुतांशी कामे पूर्ण झाली होती.

    यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने कपाशी, धान, सोयाबीन, कडधान्ये या सारखी मुख्य पिके धोक्यात आली आहेत. पिकांनी मान टाकल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला आहे. बळीराजाची नजर आकाशाकडून हटायला तयार नाही. राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने बळीराजा चिंतेत आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. त्याचा फटका फक्त बळीराजालाच नव्हे तर सर्वांनाच बसणार आहे. पाऊसपाण्याची वेदना केवळ बळीराजाची वाटत असली तरी प्रत्यक्ष तिचे व्यापक परिणाम होत असतात. उत्पादन कमी झाले तर अन्नधान्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि सगळ्यांनाच महागाईचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाची आर्थिक कुचंबणा होते. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते.

    धरण उशाला, कोरड घशाला

    आज राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी यावेळेपर्यंत राज्यातील बहुतांश धरणे भरली होती. यावर्षी मात्र बरोबर उलटे चित्र पाहायला मिळत नाही. पाऊस न झाल्याने धरण उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती अनेक शहरांची झाली आहे. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने पुढील वर्षी राज्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही आवासून उभा आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर सरकारला गुरांसाठी छावण्या उभ्या कराव्या लागतील.

    विकास कामांना लागते कात्री

    पाऊस न झाल्यास अशा विपरित गोष्टी घडतील. याउलट जर पाऊस चांगला झाला, भरघोस पीके आली तर त्याचा बाजारपेठेवर आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा चांगला परिणाम होतो. सरकारलाही विकास कामांसाठी पैसा उपलब्ध होतो. बळीराजाचे नुकसान झाले की सरकारला त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागते. त्यामुळे विकास कामांना कात्री लागते.

    राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

    पावसाअभावी पिके धोक्यात आली तर त्याचा खूप दूरगामी परिणाम होतो. हा परिणाम केवळ बळीराजावरच नाही तर समाजातील सर्व घटकांवर होतो. त्यामुळेच आता उरलेल्या सप्टेंबर महिन्यात तरी वरुणराजाने कृपा करावी, असे साकडे बळीराजा वरुणराजाला घालत आहे. जर वरुण राजाने कृपा केली नाही आणि सप्टेंबर महिनाही मागील तीन महिन्याप्रमाणेच कोरडा गेला तर बळीराजा हतबल होईलच पण त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर देखील होईल.

    युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवे

    हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये सरासरी इतका पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र ही शक्यता खरी ठरेलच की नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आणि जरी सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला तरी मागील तीन महिन्यात ५० टक्केही पाऊस न झाल्याने राज्यावरील दुष्काळाचे सावट कायम राहणार आहे. म्हणून या संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शासन प्रशासनाने आतापासूनच युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवे.