Water shortage in Maharashtra

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी माढा तालुक्यात सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, उजनी धरण परिसरात  अवर्षणग्रस्त परिस्थिती असून धरणात सध्या १४.४६ टक्के पाणी व ७.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.

  टेंभुर्णी : माढा विधानसभा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, गावोगावी पाण्याचे टँकर ,जनावरासाठी चारा- छावण्या व मजुरांना काम द्यावे लागेल. तुळशी येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात येत असून पुढील आठवड्यात माढा, मोडनिंब व परिसरातील वाड्या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील, अशी काळजी युक्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच पशुधन जगवण्यासाठी गावोगावी चारा छावण्या  काढण्याची वेळ आलेली आहे , त्यामुळे शासनाने जनतेला सर्वतोपरी मदत व सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.
  आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी माढा तालुक्यात सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, उजनी धरण परिसरात  अवर्षणग्रस्त परिस्थिती असून धरणात सध्या १४.४६ टक्के पाणी व ७.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या डावा-उजवा कालवा, भीमासीना जोड कालवा (बोगदा-सीना नदीकाठ) सीना-माढा व दहिगाव सिंचन योजना या लाभक्षेत्रातील लाखो एकर ऊस, फळबागा, चारा वैरण, व खरिपाची उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. उजनी धरणाच्या उपयुक्त साठ्यातून कालवा बोगदा व दोन्ही सिंचन योजनेद्वारे एक आवर्तन सोडले तर या उभ्या जळून चाललेल्या पिकांना पुन्हा जीवदान मिळणार आहे, परंतु यास शासन व प्रशासनाने नकार दिला आहे. सध्या उजनीच्या वरील तीन धरणातून काही नविसर्गाने पाणी खाली येत आहे.

   पशुधन जगवण्यासाठी धडपड
  कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार हे दिसून येत आहे. शेतकरी आपले पशुधन जगवण्यासाठी पाण्याअभावी जळून चाललेली ऊस व इतर काही पिके तोडून जनावरांना खाऊ घालू लागले आहेत. सर्वत्र विहिरी, बोरवेल, ओढे नाले कोरडे पडल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळण्याची अवस्था दिवसेंदिवस कठीण बनू लागली आहे.

  उजनी जलाशयात ४६२५ क्युसेक विसर्ग
  उजनी जलाशयात फक्त ४६२५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे, परंतु हा विसर्ग देखील पूर्णपणे भरवशाचा नाही. यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी शासनाने मागेल त्या गावी पाण्याचा टँकर, जनावरासाठी चारा छावण्या व मजुरांसाठी कामे देण्याची मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे.