
एका औषधी विक्रेत्याने ऑर्गेनिक पावडर (Organic Powder) म्हणून चक्क माती खरेदी केली. सायबर गुन्हेगाराने त्यांना लाल मातीचे 9 पॅकेट पाठविले. त्यासाठी प्रति पॅकेट एक किलोप्रमाणे 9 किलो मातीसाठी 15 लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
नागपूर : एका औषधी विक्रेत्याने ऑर्गेनिक पावडर (Organic Powder) म्हणून चक्क माती खरेदी केली. सायबर गुन्हेगाराने त्यांना लाल मातीचे 9 पॅकेट पाठविले. त्यासाठी प्रति पॅकेट एक किलोप्रमाणे 9 किलो मातीसाठी 15 लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
सायबर पोलिसांनी पीडित नीलेश जीवतोडे (वय 45, रा. उज्ज्वलनगर, झिंगाबाई टाकळी) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. नीलेश यांचे लाईफलाईन या नावाने औषधीचे दुकान आहे. मागील अनेक वर्षांपासून ते औषधी विक्रीच्या व्यवसायात आहेत. याशिवाय औषधी एक्सपोर्टचेही त्यांचे काम आहे. 6 सप्टेंबरला नीलेशच्या व्हॉट्सअॅपवर सायबर गुन्हेगाराने संपर्क साधला.
दक्षिण आफ्रिकेतील लोमेटोगो येथून बोलत असल्याचे सांगितले. औषधीसंबंधी विविध पावडर ऑर्डर केले. यापूर्वी आम्ही भारतातूनच पावडर खरेदी करत होतो, असे सांगितले. आपल्याला ऑर्डर मिळणार असल्याने नीलेशही आनंदी होते. परंतु, पावडर कुठून मिळवायचे याविषयी नीलेशला काहीही माहिती नव्हते. आरोपीने त्यांना मुंबईचा पत्ता आणि मोबाईल नंबर पाठविले. नीलेशने त्या नंबरवर संपर्क करून 15 लाख 85 हजार रुपये किंमतीचे ऑर्गेनिक पावडर ऑर्डर केले.
दरम्यान, नीलेशचा विश्वास बसावा म्हणून नायझेरीयाहून एक व्यक्ती त्यांना भेटायला आला. त्याने ऑर्गेनिक पावडरच्या ऑर्डरवर चर्चा केली. नीलेशने त्याचा आदरसन्मान केला. त्याला खाऊ घातले आणि एअरपोर्टपर्यंत सोडायलाही गेले.
काही दिवसातच नीलेशकडे ऑर्गेनिक पावरडची 9 पाकिटे आली. ती पाकिटे त्यांना दक्षिण आफ्रिकेला पाठवायची होती. त्यामुळे त्यांनी आरोपीशी संपर्क केला. मात्र, आरोपीने त्यांच्यापासून सर्व संपर्क तोडले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नीलेशने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.