पुण्यात ड्रग्स माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळाला

ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

    पुणे: ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ललित पाटील हा अमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे आम्ही पदार्थ जप्त केले होते. ललित पाटीलचे मोठे ड्रग्ज रॅकेटच उघडकीस आले, असते मात्र तो पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

    अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉड क्रमांक १६ मध्ये दाखल केले होते. परंतु ललित पाटील हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कामगार रौफ रहीम शेख आणि सुभाष जानकी मंडल या दोघांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करीत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरातून शेख आणि मंडल यांना शनिवारी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

    या घटनेनंतर पाटील याला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांना चकवा देवून त्याने पलायन केले. दरम्यान, रात्री आठ वाजता एक्स रे काढण्यासाठी नेणे आणि पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपीने पलायन कसे केले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘‘या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.’’