Lalit Patil
Lalit Patil

  पुणे : ससून रुग्णालयातील ड्रग्ज तस्करी तसेच ललित पाटील पलायन प्रकरणातील आरोपी अॅड. प्रज्ञा कांबळे हिने आता जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. तत्पूर्वी तिच्या वकिलांनी तिला कारागृहात जाण्यापासून वाचविण्यासाठी ती २०१९ पासून मानसिक उपचार घेत असल्याचा दावा शिवाजीनगर न्यायालयात केला आहे.

   

  तिच्या जामीन अर्जासोबत तसे वैद्यकीय प्रमाणपत्रही वकिलांनी न्यायालयात दाखल केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तिचे जर मानसिक संतुलन ठिक नसेल तर ती ललित पाटीलला पळून जाण्यास मदत कशी काय करु शकते? याकडे न्यायालयाचे लक्ष वेधल्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

   

  दरम्यान, यापूर्वी दोन सुनावण्या न्यायालयात झाल्या आहेत. मात्र, त्यावेळी वकिलांनी ती मानसोपचार घेत असल्याबाबत काही माहिती दिली नाही. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त केले. याप्रकरणातील  बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केला. या गुन्ह्यात ललित पाटील मुख्य आरोपी आहे.

  पोलिसांनी त्याची कोठडी घेण्यापूर्वीच ललित ससून रुग्णालयातून पळाला. त्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दुसरा गुन्हा नोंद झाला. दोन्ही प्रकरणात अॅड. प्रज्ञा कांबळे हिला आरोपी करण्यात आले आहे. नाशिक पोलिसांनी प्रज्ञाला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला.

  सध्या प्रज्ञा पोलीस कोठडीत आहे. तिची कोठडी  आज ( दि.7) संपणार असून, तिला शिवाजीनगर न्यायालयात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जात त्यांनी प्रज्ञा ही ती २०१९ पासून मानसिक उपचार घेत आहे. त्याची पुष्टी करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले आहे. प्रज्ञा ही स्वत: एक वकील आहे. तिला कायद्याच्या पळवाटा माहिती आहेत. तिचे मानसिक संतुलन ठिक नसेल तर ती कशी काय ललितला पलायन करण्यास मदत करु शकते? असा दावाही तिच्या वकिलांकडून केला जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.