ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडे तीन कोंटीचा ऐवज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण गाजत असतानाच शिक्षणाचे माहेर घर व आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला.

  पुणे : राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण गाजत असतानाच शिक्षणाचे माहेर घर व आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. नायजेरियन नागरिकाने विक्रीसाठी पुरवलेले एमडी हे ड्रग्ज पोलिसांनी पकडले आहे. पुण्याच्या मध्यभागात ही कारवाई केली असून, दोन कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. तसेच, दोन सराईतांसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४२, रा. सोमवार पेठ), हैदर नुर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी) व अजय आमरनाथ करोसिया (वय ३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, निलेश साबळे, अनिकेत बाबर व त्यांच्या पथकाने केली.

  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ड्रग्ज तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, युनिट एकचे पथक रात्री पेट्रोलिंग करताना पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना माहिती मिळाली की, सोमवार पेठेत एक पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा (एमएच १२ युजे ४०८१) कारमध्ये दोघे बसले असून त्यात रेकॉर्डवरील वैभव उर्फ पिंट्या माने हा आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने वैभवला व कार चालक अजय याला पकडले.

  तपासणीत वैभवकडून १ कोटींचे ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता विश्रांतवाडीतील हैदर शेखने एमडी ड्रग्ज दिल्याचे समजले. हैदरचा शोध घेतला असता त्याला विश्रांतवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ कोटींचे क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम एमडी मिळाले. अधिक चौकशीत पत्र्याच्या गोडाऊनमधून २०० ते ३०० पोती सापडली. त्यात मीठ असल्याचे दिसून आले. पोत्यात एमडी ड्रग्ज आहे का याची तपासणी केली जात आहे. हैदर शेख याच्याकडे चौकशी केली असता एमडी ड्रग्ज एका परदेशी व्यक्तीने विक्री करण्यासाठी दिल्याचे त्याने सांगितले.

  पुन्हा मोठे रॅकेट उघड

  पुण्यासारखी मेट्रोसिटी ड्रग्ज तस्करांच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच नाशिक व्हाया पुणे अन् पुणे व्हाया मुंबई असे मोठे ड्रग्ज रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले. ससून रुग्णालयात उपचार घेण्याच्या निमित्ताने दाखल होऊन ललित पाटील ते पुरवत असल्याचे उघडकीस आणले. पोलिसांनी बड्या रॅकेटचा भांडाफोड केला आणि तब्बल ३० जणांना अटकही केली. याप्रकरणानंतर ललित पळून गेल्याने तर हे प्रकरण राज्यभर गाजले.

  एकिकडे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी उच्चांकी कारवाई करत १० वर्षांचे रेकॉर्ड देखील मोडले. त्यानंतर आता आणखी एक मोठे रॅकेट उघड झाले असून, पुण्यात तस्कर सक्रिय असल्याचेही दिसत आहे.

  साडे तीन कोटींचा ऐवज जप्त

  हैदर शेख याच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे 500 एमडी ड्रग्ज, मोबाईल, सॅक, गोडाऊनमधून दीड कोटी रुपयांचे 750 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, इलेट्रॉनिक वजन काटा, तसेच वैभव उर्फ पिंट्या माने याच्याकडून एक कोटी रुपयांचे 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज, सॅक, दोन मोबाईल, 8 लाख रुपये किंमतीची इर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे. दोघांकडून 3 कोटी 58 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  कुख्यात गुन्हेगार ड्रग्ज तस्करीत…

  शहरातील कुख्यात गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यांची परेड घेतली जात असताना आता हे कुख्यात ड्रग्ज तस्करीत गुंतले जात असल्याची शक्यता आहे. वैभव माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, दरोडा यासारखे तब्बल ३६ गुन्हे दाखल आहेत. तर हैदर याच्यावर देखील एक खुनाचा गुन्हा दाखल आहे.