संभाजीनगरमध्ये ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तब्बल 250 कोटींचे कोकेन जप्त

पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्जची तस्करी (Drugs Racket) केली जात असल्याची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता संभाजीनगरमध्ये ड्रग्ज आणि कोकेनच्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

    संभाजीनगर : पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्जची तस्करी (Drugs Racket) केली जात असल्याची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता संभाजीनगरमध्ये ड्रग्ज आणि कोकेनच्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. डीआरआयच्या पुणे पथकाने छापेमारी केले. त्यामध्ये पोलिसांनी तब्बल 250 कोटी रुपयांचे (Drugs Case) कोकेन जप्त केले आहे.

    डीआरआय पथकाला 250 कोटींच्या कोकेनची खेप येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने पोलिसांच्या मदतीने शहरात सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी शहरातील काही ठिकाणी छापेमारी करत कोकेन जप्त केले आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. याआधी मुंबई, नाशिक तसेच सोलापूरमधूनही मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता संभाजीनगरमध्येही कोकेनचा साठा सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

    ललित पाटील प्रकरणी महानिरीक्षकांचा हात : शाह

    संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहे. या संदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी धुळ्यात एका कार्यक्रम दरम्यान दिली.