कोंढवा अन् विश्रांतवाडीत ड्रग्ज तस्करांना पकडले; साडे आठ लाखांचा ऐवज जप्त

कोंढवा व विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने दोन वेगवेगळ्या कारवाईत ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मेफेड्रॉनसह साडे आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    पुणे : कोंढवा व विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने दोन वेगवेगळ्या कारवाईत ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मेफेड्रॉनसह साडे आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार रेहना शेख यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कोंढवा व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कोंढव्यातील साईबाबानगर येथील कारवाईत पोलिसांनी वसिम सलिम पटेल (वय ४०, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) याला पकडले आहे. तो सार्वजनिक रस्त्यावर मेफेड्रॉन या अमली पदार्थांची विक्री करताना मिळाला आहे. त्याच्याकडून ४ लाख ६९ हजार रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    या कारवाईनंतर लागलीच पथकाने विश्रांतवाडी येथील आळंदी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरून अतुल शरद राजगुरू (वय ३२, रा. बोराटे वस्ती, मोशी) याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल मेफेड्रॉनसह जप्त करण्यात आला आहे.