cyber crime

  पुणे : तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तुमच्याविरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत असल्याचे सांगत तसेच कारवाईची भीती दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला ३१ लाख ८९ हजारांचा सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे.

  याप्रकरणी बिबवेवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १० ते १७ एप्रिल या कालावधीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सायबर ठगांनी तक्रारदारांशी मोबाईलद्वारे संपर्क केला.

  पार्सलमध्ये अमली पदार्थ

  मुंबई ते बँकॉक-थायलंड येथे पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत. ते पार्सल नार्कोटीक्स विभाग मुंबई यांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करण्यात येणार आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते अशी भिती दाखवली. तक्रारदार यामुळे घाबरले त्यांनी सायबर ठगांच्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे माहिती देत राहिले. चौकशी करण्याच्या बहाण्याने सर्व्हिलन्स खाते पाठवायचे असल्याचे भासवून त्याच्याकडून ३१ लाख ८९ हजार रुपये घेऊन फसवणूक त्यांची केली.

  टास्क फ्रॉडद्वारे ४ लाखांची फसवणूक
  कात्रज येथील एका तरुणीला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी टास्क फ्रॉडद्वारे ४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ३४ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुणीला टेलीग्रामद्वारे संपर्क साधला. टास्कद्वारे जादा पैसे कमिण्याचे आमिष दाखवले. हे काम पार्ट टाईम असल्याचे सांगितले. त्यानंतर पेड टास्क देऊन तिच्याकडून ४ लाख १२ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतले. विश्वास वाटावा म्हणून १२ हजार ३५० रुपये तिच्या खात्यावर परत दिले. मात्र, यानंर वेगवेगळ्या गोष्टी सांगत त्यांना ३ लाख ९९ हजार ६५० रुपये परत न देता फसवणूक केली.

  ज्येष्ठ नागरिकास शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक
  शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी ५ लाख ४३ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथील ६२ वर्षीय जेष्ठ व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर ठगांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख ४५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी तक्रारदारांना २ लाख २ हजार रुपये परत दिले. मात्र त्यानंतर त्यांची ५ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली.